कोरोना रुग्णांमागे पालिकेला दीड लाख निव्वळ अफवा- प्रशांत सरोदे

कोरोना रुग्णांमागे पालिकेला दीड लाख निव्वळ अफवा- प्रशांत सरोदे

अफवांवर विश्वास ठेवू नका!

वृत्तवेध ऑनलाईन | 17 Aug 2020, By : RajendraSalkar 17:40

कोपरगाव : शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यास प्रत्येक रुग्णामागे नगरपरिषदेला दीड लाख रुपये मिळत असल्याचे वृत्त सध्या शहरात वाऱ्यासारखे पसरले. मात्र, ही निव्वळ अफवा आहे. असा कोणत्याही प्रकारचा निधी नगरपालिकेला आलेला नाही. शासन स्तरावरही असा कुठलाही प्रस्ताव नाही तेंव्हा नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे.

प्रशांत सरोदे म्हणाले सर्व नागरिकांना आवर्जून सांगावे वाटते की, आमचे नगरपरिषदेचे कर्मचारी अहोरात्र कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहे. त्यापैकी जे कर्मचारी कोविड केअर सेंटरला कार्यरत आहेत ते मागील दीड महिन्यापासून कोपरगांव शहरात घर असून देखील त्यांच्या घरच्यांना भेटले नाहीत. रुग्णसेवा करत असताना त्यांच्यामुळे समाजातील लहान, वयोवृद्ध नागरिक यांना त्यांच्यापासून बाधा होऊ नये या हेतूने कोविड सेंटरला सेवा दिल्यानंतर प्रशासनाने व्यवस्था केलेल्या हॉटेलमध्ये राहत आहे. शहरातील कोरोना संबंधी सर्व अधिकार व माहिती मुख्य अधिकारी म्हणून माझ्याकडे असते त्यामुळे त्याच्याव्यतिरिक्त कुणाच्याही नावाने संदेश बाहेर फिरत असेल किंवा कुणाची ऐकिव माहिती असेल तर ती केवळ अफवाच असू शकते. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की दिनांक २२ मार्च २०२० पासून कोविड-१९ या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असताना कोपरगाव नगरपरिषद, तहसील कार्यालय, शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय या सर्व प्रशासकीय यंत्रणेमार्फत सदर विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
त्यामध्ये सॅनिटायझर फवारणी, घरोघरी आरोग्य तपासणी, बाधित रुग्णांना योग्य उपचार, बाधित रुग्ण आढळून आलेल्या भागात कंटेनमेंट झोन करणे, कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना विविध सेवा सुविधा पुरवणे, कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे या सर्व बाबी काळजीपूर्वक राबविण्यात येत आहे.

प्रशांत सरोदे म्हणाले मार्च २०२० पासून कोरोना बाधित रुग्णांमागे कोणताही निधी नगरपरिषदेला मिळालेला नाही. भविष्यात देखील निधी मिळेल याबाबत शासन स्तरावर कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना आवाहन करतो की, समाज माध्यमातून पसरणाऱ्या अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये.
प्रशासनाने दिल्या सूचनांचे पालन करावे.प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा व सोशल डिस्टंसिंगचे पालन या त्रिसूत्रीचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करून प्रशासनाला सहकार्य करावे.घरी राहा…. सुरक्षित राहा….
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. असे आव्हान मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे यांनी शेवटी केलेले आहे

*

Leave a Reply

You cannot copy content of this page