आषाढी एकादशी : माहिती आहे का? एकादशी प्रथेला कशी झाली
कोपरगाव :
प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक व कृष्ण पक्षात एक याप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात. अधिक मास असल्यास त्या दोन एकादशी जास्त असतात. पण त्यापैकी आषाढी व कार्तिकी एकादशी व त्यापेक्षा आषाढी एकादशीचे महत्व अधिक मानण्यात येते. या वर्षी सोमवार, 23 जुलैला आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे नामस्मरण करून आत्मिक शांती आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा पूर्ण केली जाऊ शकते.
आषाढ महिन्यातील एकादशीला फार पवित्र मानण्यात येते. म्हणून या एकादशीला महाएकादशी म्हणतात. या महिन्यातील अत्यंत आनंदाचा हा दिवस असतो. पांडुरंगाच्या भेटीसाठी कोसच्याकोस पावसा-पाण्यात भिजत-चिंबत जाणार्या वारकरी भक्तांचा दिंडीचा सोहळा अत्यंत मनोरम असा असतो. एक एकादशीस आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामाची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथाची, सासवडहून सोपानदेवाची, पैठणहून एकनाथांची व उत्तर भारतातून कबीराची पालखी निघते. महाराष्ट्रातून तीन लाखांपेक्षा अधिक वारकर्यांची “चंद्रभागे”च्या काठी जत्रा भरते. सर्व जाती-जमातींना भक्तिप्रेमाच्या जोरावर परमेश्वराचा मार्ग मोकळा करून देणारा व परमार्थाच्या प्रांतात लोकशाहीचे रूप विकसित करून देणारा वारकरी संप्रदाय म्हणजे विकसित वैष्णवधर्मच होय.
पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे.
पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे.
एकादशीची कथा
मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराने प्रसन्न होऊन तू कोणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील,’ असा वर दिला होता. या वरामुळे उन्मत झालेला राक्षसाने देवांवर स्वारी केली. यावेळी सर्व देव मदतीसाठी शंकराकडे धावले. मात्र शंकारांनाही काही करता येत नव्हते. यावेळी देव शंकरासह एका गुहेत जाऊन लपून बसले. यावेळी देवांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिने मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली. त्या दिवशी पाऊस पडत होता. त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले. तसेच सर्वजन गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात पडला. या देवीचे नाव होते एकादशी
शास्त्रानुसार, जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णुसह देवी एकादशीची मनोभावे पूजा करतो ती व्यक्ती पापमुक्त होते असे म्हटले जाते. तसेच त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होते.
आषाढी (देवशयनी) एकादशी
इतिहास
पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारले. ही जी शक्तीदेवी तीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात.
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी’ म्हणण्याचे कारण : मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात.
आषाढी एकादशीचे महत्त्व : देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्तीं पासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते. या आषाढी एकादशीचे महत्त्व खुप मोठे असून या एकादशी व्रताने सर्व पापांचा नाश होतो, अशी वारक-यांची भावना असल्याने एकादशीच्या दिवसाला वारक-यांचादृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पूजाविधी : या दिवशी श्रीविष्णूची `श्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.
पंढरपूरची वारी : वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे.
श्री विठ्ठलाला तुळस आणि मंजिरींचा हार का वहातात ?
तुळस
तुळशीमध्ये श्रीविष्णूची सूक्ष्म स्पंदने (तत्त्व) आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. श्री विठ्ठल हे श्रीविष्णूचेच रूप आहे. विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला साहाय्य होते. त्यामुळे मूर्तीतील चैतन्याचा लाभ उपासकाला मिळतो.
या गोष्टी एकादशीच्या दिवशी करु नयेत.
एकादशीच्या दिवशी रात्री झोपणे, पान खाणे, खोटं बोलणे, जुगार खेळणे या गोष्टी करु नयेत.





