शिक्षकाने लॉक डाऊन काळात साकारली हस्तलिखित ज्ञानेश्वरी
वृत्तवेध ऑनलाइन। 6 Sep 2020
By: Rajendra Salkar, 17.17
By: Rajendra Salkar, 17.17
कोपरगांव : संवत्सर येथील सेवानिवृत्त शिक्षक व नेवासा फाटा येथे वास्तव्यास असलेले ७६ वर्षीय रंगनाथ किसन डहाळे सर यांनी लॉक डा ऊ न काळात ९ हजार पानांची हस्तलिखित ज्ञानेश्वरी प्रत तयार करून माऊलींच्या चरणी शिक्षक दिनीअर्पण केली आहे. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हरि भक्त परायण गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथाची विधीवत पूजा करण्यात आली.
प्राचार्य डॉ. आर एच. शिंदे यांनी डहाळे सर यांना हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहिण्याची प्रेरणा दिली, त्याप्रमाणे त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला. रंगनाथ किसन डहाळे सर यांनी सेवानिवृत्तीनंतर कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील रामदासी बाबा यांच्या जीवन कार्याचा चिकित्सक अभ्यास करून त्यावर कृष्णा गोदाकाठचे योगी रामदासी बाबा, तीन खणीचा रामानुभव, रामदासी बाबा आणि समर्थ विचारधारा या तीन पुस्तकांचे लेखन करून ते जनतेच्या वाचनालयात लोकार्पण केले आहेत. डहाळे सर यांना संत साहित्याचे वाचन करून त्याचा अभ्यास करण्याचा छंद आहे. त्यांनी अलीकडेच संत नरहरी सोनार साहित्याचा अभ्यास करून त्यावर चौथ पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर माऊलींचे रचनास्थान असलेल्या नेवासा येथील “पैस”खांबास ही हस्तलिखित केलेली ज्ञानेश्वरी त्यांनी अर्पण केली.संपूर्ण ज्ञानेश्वरी हस्तलिखित करण्यासाठी रंगनाथ डहाळे यांनी लॉक डा ऊ न काळात जून २०२० पासून प्रारंभ केला, या कालावधीत त्यांनी ९ हजार १० पाने हस्त लिखित केली. मंदिर देवस्थानचे प्रमुख ह भ प शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते माजी शिक्षक रंगनाथ डहाळे यांचा सत्कार करण्यात आला., यावेळी युवा चित्रकार सत्यजित उदावंत,अंबादास महाराज भागवत गुरुजी,गोरख भराट,संदीप आढाव उपस्थित होते. कोकमठाण येथील रामदास बाबा भक्त मंडळानेही रंगनाथ डहाळे यांचे अभिनंदन केले आहे.





