केवळ पंचनाम्याचे कागदपत्रे रंगवू नका, शेतक-यांना पैसे दया – सौ. स्नेहलता कोल्हे

केवळ पंचनाम्याचे कागदपत्रे रंगवू नका, शेतक-यांना पैसे दया – सौ. स्नेहलता कोल्हे

वृत्तवेध ऑनलाइन। 7 Sep 2020
By: Rajendra Salkar, 17.15

कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातील पुर्व भागातील अनेक गावांना पुन्हा एकदा वादळी वा-याचा व अतिवृष्टीचा तडाखा बसला, हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिसकावला गेला, डोळयादेखत उभी पिके जमीनदोस्त झाली, त्यामुळे शेतक-यांपुढे मोठे आर्थीक संकट उभे राहिले आहे, अशा परिस्थितीत केवळ पंचनामे करून कागदपत्रे रंगविण्यापेक्षा शेतक-यांना तातडीने आर्थीक मदत करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचेकडे केली आहे.

तालुक्यातील खोपडी, लौकी, कान्हेगाव, संवत्सर, भोजडे, धोत्रे, आपेगाव, कासली, शिरसगाव, गोधेगाव, दहेगाव बोलका, पढेगाव, करंजी, खिर्डीगणेश आदी गावांना अतिवृष्टी आणि वादळाचा मोठा तडाखा बसला, कापूस, सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांबरोबर उस पिकांचे मोठे नुकसान झाले. या झालेल्या नुकसानीची पहाणी सौ कोल्हे यांनी आज केली. त्यावेळी त्यांचेसमवेत माजी तालुकाध्यक्ष शरदराव थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम होते.
सोंगणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. वारंवार आलेल्या संकटाला तोंड देत त्यातून स्वतःला सावरत, आर्थीक तरतूद करत पीके उभी केली होती. सध्याच्या कोरोना परिस्थीतीमुळे लाॅकडाउन काळातील पिकवलेला शेतीमालही कवडीमोल भावात विकावा लागला, मोठा आर्थिक फटका या कालावधीत शेतक-यांच्या वाटयाला आला. या सर्व संकटावर मात करत उभी केलेली पिके अतिवृष्टी आणि वादळी वा-याने जमीन दोस्त झाली. हजारो हेक्टरवरील उभी पिके भुईसपाट झाली, त्यामुळे शेतक-यांच्या संकटात आणखी भर पडली आहे, या संकटातून सावरणे कदापीही शक्य नाही, परंतू तरीही त्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी, याकरीता नेहमीप्रमाणे केवळ पंचनामे करून कागदपत्रे रंगविण्यापेक्षा त्यांना तातडीने आर्थीक मदत करण्याची मागणी सौ कोल्हे यांनी केली आहे. ज्या शेतक-यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविलेला आहे, त्यांनी झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी तालुक्याच्या कृषी कार्यालयात लेखी अर्ज सादर करावा,असे यावेळी कृषी अधिकारी यांनी सांगितले

१) चौकट –
मायबाप असलेल्या सरकारचे आमदार हे लोकप्रतिनिधींत्व करीत असतात, ज्यावेळी संकट येते त्यावेळी शेतक-यांचे अश्रू पुसण्याचे काम आमदारांनी करावयाचे असते, प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजे. परंतु ते काम सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे या करत आहे.
घनश्याम वारकर – शेतकरी खोपडी

२) चौकट –
लाखाच्या नुकसानीपोटी हजाराचा चेक, तोही वर्ष सहा महिन्यांनी

१५ दिवसाच्या अवधीनंतर हातात येणारा घास डोळयादेखत जमीनदोस्त होतो, गेल्या चार महिन्यापासून जीव ओतून जोपासना केली, जोमात आलेली पिके अचानक आलेल्या पावसामुळे उध्दवस्त होतात, चार महिन्याच्या कष्टावर अक्षरशः पाणी फिरले. नेहमीप्रमाणे पंचनामे करण्याचा घाट घालून वर्ष, सहा महिन्यांनी लाखाच्या नुकसानापोटी हजाराचा चेक हातात येतो. ही जगाच्या पोशिंदयाची अवस्था आहे. हे सरकार शेतक-यांचेच काय पण कोणाच्याच हिताचे नाही – संतोष देशमुख शेतकरी

Leave a Reply

You cannot copy content of this page