खोटे बोल पण रेटून बोल! हेच आमदाराचे धोरण -विवेक कोल्हे
विवेक कोल्हे यांचा आशुतोष काळेवर निशाणा
वृत्तवेध ऑनलाइन | 9 Sep 2020
By : Rajendra Salkar 19.20
खोटे बोल पण रेटून बोल! हेच आमदाराचे धोरण असल्याची टीका विवेक कोल्हे यांनी केली आहे. नगरपालिकेला रस्त्यासाठी सहा कोटी इतका निधी मिळाला आहे परंतु हा निधी आपल्या पाठपुराव्यामुळे मिळाले चा गाजावाजा आमदार यांनी केला. याच वक्तव्याचा समाचार घेताना विवेक कोल्हे यांनी आमदार काळे यांचं धोरण म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल असंच आहे असं म्हटलं आहे.
ग्रामीण भागात विकासात्मक कामांना चालना देण्यासाठी १४ वित्त आयोगामार्फत विविध योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना निधी पुरविला जातो.
कोपरगाव नगरपालिकेने १४ व्या वित्त आयोगांतर्गत अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविलेला होता, या प्रस्तावामध्ये शहरातील विविध रस्त्यांच्या कामांचा समावेश केलेला असून सदरचा प्रस्तावास मंजुरी मिळून निधी वर्ग होणे हा या प्रक्रियेतील भाग असल्याने यासाठी पाठपुराव्याची आवश्यकताच नसते, परंतु विद्यमान आमदार नेहमीप्रमाणे नगरपालिकेसाठी ६ कोटी रूपयाचा निधी आणण्यासाठी मी पाठपुरावा केला असल्याचे सांगत आहे, खोटे बोल, पण रेटून बोल हे एकच काम निवडुन आल्यापासून हेच त्यांचं धोरण आहे असं विवेक कोल्हे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे नाव न घेता हा टोला लगावला आहे.
माजी आ. सौ स्नेहलता कोल्हे यांनी मतदार संघामध्ये मोठया प्रमाणात निधी आणून विकासाचा डोंगर उभा केला, अनेक प्रलंबित कामांचा पाठपुरावा करून ती मार्गी लावण्याचे काम केले. त्यासाठी शासनाच्या विविध खात्याकडून निधी आणला, त्याचे कागदपत्रीय सोपस्कर पुर्ण केले. या धावपळीत त्यांना बऱ्याच कामांचे भूमिपूजन करता आली नाही. मंजुर कामांचे भुमिपूजन करण्यात विद्यमान आमदार धन्यता मानत आहे.
१४ व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त अनुदानातील जी रक्कम शिल्लक आहे, त्या रक्कमेतुन कोपरगाव शहरातील विविध रस्ते कामासाठी निधी मिळावा म्हणून कोपरगाव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा ठराव नं. ३० दि. २६ जुलै २०१८ आणि ठराव नं. ५ दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ रोजी सभेने मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे मा.जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी दिनांक ३ आॅगस्ट २०१५ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून १४ वा वित्त आयोगांतर्गत बंधनकारक भागातील शिल्लक रकमेतून रूपये ५ कोटी ९३ लाख ८४ हजार ५४८ रूपये खर्चासाठी प्रशासकीय मान्यता मंजुर करीत असल्याचे म्हटले आहे. ही वस्तुस्थिती असतांना विद्यमान आमदारांना त्यांच्या प्रयत्नातून कोणत्याही प्रकारचा निधी मतदारसंघासाठी आणणे शक्य होत नाही, आणि ते मतदार संघासाठी निधी आणूच शकत नाही म्हणून नगरपालिकेच्या १४ व्या वित्त आयोगांतर्गत मिळालेला सुमारे ६ कोटी रूपयाचा निधी मीच मिळविला असल्याचे गाजावाजा विद्यमान आमदार करीत आरोप विवेक कोल्हे यांनी केला