आ.आशुतोष काळे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदींना भेटले
वृत्तवेध ऑनलाईन।Mon14Sep20
By: Rajendra Salkar, 20.00
कोपरगाव : तालुक्याच्या विविध प्रश्नांबाबत आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच जिल्हधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेवून त्यांच्याकडे आरोग्य, वीज पाणी आदी प्रश्न मांडून हे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे.
आ. आशुतोष काळेंनी सोमवार (दि.१४) रोजी जिल्हधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली. कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या श्री.साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवावे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास अद्यावत रुग्णवाहिका मिळावी. तसेच आरोग्य सेवकांची संख्या कमी असल्यामुळे रुग्णांना योग्य प्रकारे सेवा मिळत नाही त्यासाठी आरोग्य विभागात तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य सेवकांची भरती करावी. कोपरगाव तालुक्यातील मोर्वीस गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण असून मोर्वीस गावाच्या पाणी साठवण तलावासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. कोपरगाव तालुक्यात अनेक वीज रोहित्रांवर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे हे वीज रोहित्र नादुरुस्त होवून विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याठिकाणी नवीन वीज रोहित्र बसविण्यात यावे आदी मागण्या आ. काळे यांनी जिल्हधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केल्या आहे. या मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर हे प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या श्री.साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या अंत्यवस्थ रुग्णांना बेड आरक्षित ठेवण्याबाबतचे आदेश सबंधित विभागाला जिल्हधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहे.