अगदी पौराणिक काळापासून वैद्य ते आजचे डॉक्टर यांना देव मानले जात आहे. थोडक्यात डॉक्टर म्हणजे खऱया अर्थाने पृथ्वीवरील मानव रूपातील देवदूत. आपलं शरीराचं दुखणं, मनाचं दुखणं, हमखास बरं करणारे, पण आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने ‘डॉक्टर’ या शब्दाची व्याख्या फक्त एवढय़ापुरतीच मर्यादित आहे का? डॉक्टर म्हणजे दिलासा… मनाला उभारी… जीवनाची नवी उमेद… असह्य वेदनेतून हमखास सुटका… थोडक्यात, आरोग्याची वाट सुलभ करणारा एक अवलिया, अशी कालपर्यंत ज्यांची ओळख होती. ओळखीला कोरोना सारख्या महामारीत त्यांनी केलेले काम व दाखविलेले धैर्य, धाडस यामुळे एक योध्दा म्हणून त्यांची नवी झळाळी मिळाली आहे . विषेश म्हणजे जगभरातील लोकांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करीत योध्दा हा सर्वमान्य किताब बहाल केला आहे. डॉक्टर या व्यक्तीमत्वाबद्दल
याविषयी माहिती देणारा हा लेख.
डॉक्टर्स डे!’ पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व निष्णात डॉक्टर बी. सी. रॉय यांचा जन्मदिन. डॉक्टरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. परंतु गेल्या काही वर्षांतील बदललेली सामाजिक परिस्थिती पाहता सरसकटपणे (व्यक्तिगत नव्हे) डॉक्टर अथवा वैद्यकीय व्यवसायाविषयी समाजात कृतज्ञतेची भावना राहिली आहे का, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. काही वर्षांपूर्वीच सेलिब्रिटी आमिर खानने वैद्यकीय व्यवसायाचे जे काही प्रदर्शन केले, त्यामुळे डॉक्टरांविषयीचा संशय अधिकच बळावला आहे असे जाणवले. या निमित्ताने वैद्यकीय व्यवसाय, समाजव्यवस्था, प्रसारमाध्यमे, जागतिक स्तरावर भारताचे बदलते रूप या सर्व गोष्टींविषयी विचारमंथन करण्याची वेळ आली आहे. समाजात एक डॉक्टर म्हणून वावरताना असे जाणवते की अजूनही व्यक्तिगत स्वरूपात डॉक्टरांविषयी आस्था आहे, आदर आहे, मान-सन्मानही आहे; पण वैद्यकीय व्यवसायाविषयी मात्र लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे, असूया आहे, संशय आहे. असे का? खरोखर ही वस्तुस्थिती आहे का? तर होय, ही वस्तुस्थिती आहे! पण मग याला जबाबदार कोण, असा प्रश्न पडतो. गेल्या दोन दशकांत आपल्या देशात झालेले सामाजिक, राजकीय, नैतिक व आर्थिक बदल बघितले तर आजचा डॉक्टर व वैद्यकीय व्यवसाय यात झालेले बदल नैसर्गिक वाटतात!
वैद्यकीय शिक्षणाचे खासगीकरण हा त्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा समजता येईल. वैद्यकीय सेवा, डॉक्टर्स यांच्याबद्दलचे जे भीषण चित्र आपल्याला दिसते आहे, त्याची बीजे सर्वप्रथम तेव्हा रोवली गेली. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस, त्यासाठी लागणा-या पायाभूत सुविधा – उदा. जागा, हॉस्पिटल, कॉलेज इमारत इत्यादी सर्व गोष्टी या अत्यंत खर्चीक होत्या आणि त्या उभ्या करण्याची ताकद फक्त धनाढ्य अशा राजकारण्यांकडेच होती आणि तिथेच वैद्यकीय व्यवसायाचा आपल्या देशातील हास सुरू झाला, असे आज जाणवते. त्या काळी धनदांडग्या व्यावसायिकांनी- मग त्यात असे अनेक व्यावसायिक होते की ज्यांच्याकडे पैसा होता पण प्रतिष्ठा नव्हती, अशांनी पैसे भरून आपल्या मुलांना डॉक्टर होण्यासाठी पाठवले. हळूहळू हे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे लोण सर्वत्र पसरले. अनेक राजकारण्यांनी याकडे धंदा म्हणून बघितले व सत्तेचा उपयोग या महाविद्यालयांना परवानगी मिळवण्यासाठी झाला. दरम्यानच्या काळात पदव्युत्तर शिक्षणाचे महत्त्वदेखील वाढीस लागले. फक्त एमबीबीएस न होता पुढील शिक्षण म्हणजे एमडी/एमएस यासारख्या पदव्या असल्यास प्रॅक्टिस करणे सोपे जाते, हे बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे हळूहळू स्पेशालिटी प्रॅक्टिसेस वाढीस लागल्या. समाजातील सर्व व्यावसायिकांचा – मग ते बिल्डर असोत, सीए असोत, वकील असोत अथवा उद्योजक असोत, व्यवसाय करण्यामागील हेतू पैसे कमावणे हा होऊ लागला. कारण समाजातील व्यक्तीची पत त्याच्या ज्ञान अथवा कौशल्यावरून न ठरता ती पैशावरून ठरू लागली. याला डॉक्टर तरी अपवाद कसे ठरणार? डॉक्टरांमध्येदेखील पैसे कमावणे ही भावना वाढीस लागली आणि तिथूनच ख-या अर्थाने वैद्यकीय पेशातील मालप्रॅक्टिसेसना सुरुवात झाली. दिखाऊपणा वाढीस लागला, मार्केटिंगची सुरुवात झाली. पेशंटकडे ग्राहक म्हणून बघितले जाऊ लागले. नीट विचार केला तर असे लक्षात येते की समाजातील इतर व्यावसायिकांमध्ये ज्या पद्धतीचे बदल होत होते तसेच बदल वैद्यकीय पेशातदेखील होत होते. कारण डॉक्टर हादेखील त्याच समाजात वावरणारा एक घटक होता. पैसे खर्च करून खासगी वैद्यकीय महाविद्यालयातून बाहेर पडून प्रॅक्टिस सुरू करणा-या डॉक्टरची मानसिकता बदललेली होती. त्याला त्याच्या शिक्षणावरील खर्च वसूल करायचा होता. त्यासाठी वाट्टेल ते करायची त्याची तयारी होती. त्याच काळात सरकारी क्षेत्रात तसेच सार्वजनिक क्षेत्रात ‘दलाली’ही चांगलीच फोफावली होती. हळूहळू तिचा शिरकाव वैद्यकीय पेशात होऊ लागला. हळूहळू रुग्ण ग्राहक झाला आणि मग सरकारने डॉक्टरांना ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत समाविष्ट केल्यावर त्यावर औपचारिकरीत्या शिक्कामोर्तब झाले. समाजातील अनिष्ट प्रवृत्ती वाढीस लागल्या होत्या. रुग्ण दगावल्यावरदेखील डॉक्टरांवर विश्वास ठेवणारा समाज आता डॉक्टरांविरुद्ध उपचारातील हलगर्जीपणाबद्दल केसेस करू लागला होता. डॉक्टर व रुग्ण यातील विश्वासाचे नाते लोप पावायला सुरुवात झाली आणि डॉक्टर अधिक सावध झाले. समाजातील इतर सर्व घटकांप्रमाणे डॉक्टरदेखील प्रलोभनांना बळी पडतो, याचा वापर करून फार्मा कंपन्या डॉक्टरांना भेटवस्तू, परदेशवा-या इ. गोष्टी ऑफर करू लागल्या. यात चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्सदेखील भरडले गेले. धर्मदाय रुग्णालयाची कन्सेप्ट मागे पडून गेल्या काही वर्षांपासून मोठमोठाल्या भांडवलदारांनी व सामाजिक संस्थांनी तंत्रज्ञान मशिनरी युक्त अत्याधुनिक हॉस्पिटल उभारून डॉक्टरांच्या कंपनीला करार पध्दतीने चालविण्यासाठी दिले आहेत. मोठी व्यवसायिकता वैद्यकीय क्षेत्रात आल्यामुळे रूग्णाबद्दल असलेली आत्मीयता लोप पावत आहे. जनतेला आरोग्य सुविधा मिळावी या दृष्टीने सरकारने आरोग्य योजना केल्या आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे.त्यामुळे शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे भरीस भर जनजागृतीमुळे लोक आरोग्यविमा मोठ्या प्रमाणावर घेऊ लागल्यामुळे व विम्यामुळे पैशाची हमखास शास्वती असल्याने गरज नसतानाही मोठाल्या शस्त्रक्रिया पार पडू लागले आहे. अशी एक भावना समाजामध्ये निर्माण होत आहे. याच गोष्टी वैद्यकीय व्यवसायासाठी भविष्यात अविश्वास निर्माण करणा-या ठरणार आहेत. सोशल मिडीयाने जग जवळ आल्याने वैद्यकीय व्यवसायाबद्दलची जागृती झाली झाली आहे जेनेरिक मेडिकल स्टोअर्स मुळे औषधांमधील प्रचंड तफावत ग्राहकांच्या नजरेत येऊ लागली आहे. टक्केवारीचा होणारा बोलबाला यामुळे वैद्यकीय क्षेत्राबद्दल अविश्वासाचे मोठे लोण पसरत आहे ही बाब गांभीर्याने विचार करण्यासारखी आहे.
एकूणच वैद्यकीय व्यवसायातील अनिष्ट गोष्टींची चर्चा सर्वत्र होऊ लागली आणि समाजाने सरसकटपणे वैद्यकीय व्यवसायावर भ्रष्टतेचे लेबल लावले. परंतु असे केल्याने आपण चांगल्या डॉक्टरांवर, चांगल्या पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय करणा-यांवर अन्याय करत आहोत, याचा विचार समाजाने केला नाही आणि पर्यायाने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला. कारण चांगल्या पद्धतीने, रुग्णहिताची प्रॅक्टिस करणा-या डॉक्टरांना जेव्हा समाजाकडून वाईट वागणूक मिळाली, तेव्हा त्यांचीही मानसिकता हळूहळू बदलायला लागली आणि अशा पद्धतीने समाजानेदेखील वैद्यकीय व्यवसाय भ्रष्ट करण्यास हातभार लावला.
आजच्या वैद्यकीय व्यवसायाच्या अवस्थेची कारणमीमांसा करताना काय चित्र दिसते? तर वैद्यकीय व्यवसायाकडे एक उत्तम व्यवसाय म्हणून बघितले जाते. वस्तुस्थिती अशी आहे की इतर व्यवसायांप्रमाणे मोजकीच मंडळी प्रचंड पैसे कमावतात. इतर डॉक्टरांना शिक्षण, जागा, हॉस्पिटल यासाठी लागणा-या खर्चाचा विचार करता प्रॅक्टिस मिळवणे अतिशय जिकिरीचे झाले आहे. आज अनेक डॉक्टर्स ज्यांना आर्थिक आधार नाही, ते नोक-या शोधताना दिसतात. त्यातच सरकारने अतिशय जाचक असे विविध नियम लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे; जेणेकरून वैद्यकीय उपचारांचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढीस लागणार आहे. दुर्दैवाने यातील ज्या जमेच्या बाजू आहेत, त्याबद्दल फारशी चर्चा होताना दिसत नाही. आपल्या देशाचा जागतिक स्तरावर विचार केला तर आपली आरोग्य सेवा ही आजही अतिशय स्वस्त आहे, आपल्याकडे डॉक्टर्स, औषधे सहजासहजी उपलब्ध आहेत. आजही असंख्य डॉक्टर्स रुग्णांवर अतिशय माफक दरात उपचार करत आहेत. डॉक्टर व रुग्ण यातील संबंध उत्तम राहिल्यास ते समाजाला पूरक आहे. डॉक्टर हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. ती प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. त्याची नकारात्मक बाजू सतत समाजापुढे मांडल्याने अंतिमत: समाजाचेच नुकसान आहे.
डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये विश्वास आणि सुसंवाद या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रुग्णाचा डॉक्टरांवर असलेला विश्वास त्याच्या उपचारासाठी फार महत्त्वाचा असतो.