सुरेगाव उपसरपंचपदी काळे गटाचे मच्छिंद्र हाळनोर बिनविरोध
वृत्तवेध ऑनलाईन | 15 Oct 2020,
By: Rajendara Salkar 15.30
कोपरगाव : तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या सुरेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे मच्छिंद्र रावजी हाळनोर यांची बिनविरोध करण्यात आली आहे.
सुरेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सुनील कोळपे यांनी रोटेशन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या उपसरपंच पदाची निवडणूक लोकनियुक्त सरपंच शशिकांत वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी काळे गटाचे मच्छिंद्र हाळनोर यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीवर सातत्याने काळे गटाचे वर्चस्व असून एकून १७ सदस्यांपैकी १५ सदस्य व सरपंच पद काळे गटाकडे असून विरोधी पक्षाचे केवळ २ सदस्य आहेत.
उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करतांना नवनिर्वाचित उपसरपंच मच्छिंद्र हाळनोर म्हणाले की, आमचे मार्गदर्शक कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी करीत असलेल्या प्रयत्नांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेगाव ग्रामस्थांचे स्थानिक प्रश्न समजावून घेवू. सरपंच व सर्व सदस्यांना सोबत घेवून एक विचाराने हे प्रश्न सोडवून सुरेगावच्या विकासाची परंपरा यापुढेही कायम ठेवून आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक अधिकारी एन. डी. खेडकर यांनी काम पाहिले. याप्रसंगी सरपंच शशिकांत वाबळे, मावळते उपसरपंच सुनील कोळपे, सदस्य डॉ.आय.के.सय्यद, विष्णू सोनवणे, संजय ढोणे, बन्सी निकम, सौ. सविता जाधव, सौ. विनिता सुपनर, सौ. सविता लोंढे, सौ. जयश्री मेहेरखांब, कु.रश्मी कदम आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच मच्छिंद्र हाळनोर यांचे माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.