तहसीलदारांनी स्वतः फिर्यादी होऊन ; शिव रस्ते अडविणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत – ॲड. गौरव गुरसळ
वृत्तवेध ऑनलाईन | 15 Oct 2020,
By: Rajendara Salkar 14.00
तालुक्यातील ७९ गावातील शिव रस्त्यांची अधिकृत मोजणी करून खुणा निश्चित करा ….
कोपरगाव : शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नाला हात घालताना, कोपरगाव तालुक्यातील ७९ गावांमधील शिवरस्त्याची अतिक्रमणे काढून शिव रस्ते खुले करावेत, जर मुद्दामहून अडवला असेल त्यांच्याविरुद्ध स्वतः माननीय तहसीलदार यांनी फिर्यादी होऊन फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी कोपरगाव वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. गौरव गुरसळ यांनी थेट आमदारांच्या जनता दरबारात उपस्थित करून या मागणीचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे यांनाही दिले आहे.
ॲड.गौरव गुरसळ यांनी सोमवारी आमदार आशुतोष काळे यांच्या जनता दरबारामध्ये हा प्रश्न उपस्थित करून आमदारांचे लक्ष वेधले होते.
निवेदनात ॲड. गुरसळ यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील सर्व गावातील गावठाण मोजणी करण्यात यावी, अतिक्रमण केलेले भुखंड काढून घ्यावे, या विरोधात कडक कारवाई करून याची अंमलबजावणी करावी, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याची तसेच पोट रस्त्यांची देखील नव्याने मोजणी होऊन त्याची हद्द निश्चित करण्यात यावी, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या करून देण्यात याव्या, याबरोबरच जलसंधारण विभागाच्या मार्फत गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात असलेल्या सर्वच चाऱ्या खोलीकरण करून रुंद करण्यात याव्या, या मागण्या केलेल्या आहेत.
ॲड. गुरसळ म्हणाले, कोपरगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कमाल भूधारणा कायद्या नुसार काढून घेण्यात आल्या व जमिनी नवीन शर्तीने देण्यात आल्या ज्या लोकांनी सरकारने घालून दिलेल्या अटी व शर्तीचा भंग केला आहे. त्या लोकांच्या जमिनी काढून घेऊन त्या मूळ मालकाला परत देण्यात याव्या किंवा त्यांचा सरकारने सार्वजनिक कामासाठी वापर करावा यासाठी प्रशासनाने त्वरित पंचनामा करण्याचे आदेश देण्यात द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. जनता दरबारात एडवोकेट गुरसळ यांनी उपस्थित केलेल्या अभ्यासपूर्ण व मुद्देसूद प्रश्नामुळे शेतकरी वर्ग तसेच नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.





