ओला दुष्काळ जाहीर करा,  नुकसान भरपाई द्या- परजणे

ओला दुष्काळ जाहीर करा,  नुकसान भरपाई द्या- परजणे

वृत्तवेध ऑनलाईन | 19 Oct 2020,
By: Rajendara Salkar 18.00

  कोपरगाव:  यावर्षीच्या अतिवृष्टीने आता परतीच्या पावसाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर — न भूतो न भविष्यतीअसे संकट उभे राहिले असल्याने  पंचनाम्यापेक्षा ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट नुकसान भरपाई  द्यावी अशी मागणी झेडपी सदस्य  राजेश परजणे पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे  केली आहे .

  निवेदनात परजणे यांनी नमूद केले की, मागील वर्षीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना गारपीट,  दुष्काळ, अनेक ठिकाणी आलेले महापूर, पुन्हा अवकाळी, त्यातच रोगराई अशा एक ना अनेक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. त्यातून सावरत असताना आणि यावर्षी चांगल्या पीक पाण्याची अपेक्षा असताना सततच्या पावसाने फुलोऱ्यात आलेले सोयाबीन, कापूस, बाजरी, उडीद, मूग, तूर, कांदा, बटाटा, भात, ऊस या पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. त्यातूनही शेतकऱ्यांनी स्वतःला सावरुन घेताना संकटातून वाचलेल्या पिकांची जपणूक केली होती. परंतु गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने थैमान घातल्याने उरली सुरली पिके नष्ट करुन टाकली आहेत.
  अहमदनगर जिल्ह्यात रविवारी दुपारी व सोमवारी परतीच्या पावसाने विजेच्या कडकडाटासह जोरदार तडाखा दिला. शेती व पिके धान्य भाजीपाला भिजून गेला. काही ठिकाणी तर उभ्या पिकांसह शेती देखील वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी घरे पडली आहेत तर अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. जनावरांचे हाल झाले आहेत. थोड्याफार प्रमाणात वाचलेली पिके आणि फळबागांचे पूर्णपणे नुकसान झाल्याने हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. 
एकतर आधीच कोरोना महामारीमुळे कोलमडून गेला आहे. तेंव्हा  नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. असे निवेदनात नमूद केले आहे. हे निवेदन मुख्यमंत्री यांना पाठविले असून निवेदनाच्या प्रती उप मुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते ना. देवेद्र फडणवीस यांनाही पाठविल्या आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page