राज्य सरकारने साखर धंदा वाचवण्यासाठी भरीव असे पॅकेज जाहीर करावे : बिपिन कोल्हे
बोलल्याप्रमाणे २५ हजार देऊन शेतकऱ्यांना वाचविण्याची राज्य सरकारला सुवर्णसंधी
वृत्तवेध ऑनलाईन | 21 Oct 2020,
By: Rajendara Salkar 15.00
कोपरगाव : तीन तोंडाचे सरकार असलेल्या राज्य सरकारने कराच्या नावाखाली सर्वप्रथम दारूची दुकाने खुली केली. राज्यातील सर्वात मोठया साखर उद्योगातून राज्य सरकारला अब्जावधी रुपयांचा कर दिला जातो याच साखर धंद्याशी निगडित असलेले आजी-माजी लोकप्रतिनिधी, मंत्रीगण सरकारात आहे. तेंव्हा राज्य सरकारने साखर धंदा वाचवण्यासाठी भरीव असे पॅकेज जाहीर करावे अशी जोरदार मागणी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी बुधवारी (२१) रोजी कारखान्याच्या ५८ व्या गळीताच्या अग्नीप्रदीपन सोहळ्यात केले.

बिपीन कोल्हे म्हणाले, चालू गळीत हंगामात राज्यात एकशे पाच लाख टन साखरेचे विक्रमी उत्पादन होणार आहे, मागील हंगामाचा साठा साखर साठा अजूनही गोदामात पडून आहे, स्वातंत्र्यानंतर साखर उद्योगाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एफ. आर. पी. व एम. एस. पी. हे दर ठरवून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, त्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन करावे लागेल. त्याचप्रमाणे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचा निर्णय घेऊन तसे करार पुढील पाच वर्षासाठी पेट्रोलियम कंपन्या बरोबर केलेले आहेत. साखर धंद्यावर पडणारा व्याजाचा भुर्दंड ही केंद्र सरकार सोसत आहे. अतिरिक्त साखरेमुळे जागतिक बाजारात साखर दराची घसरण होणार आहे. केंद्र सरकारने एफ. आर. पी. मध्ये शंभर रुपयाची वाढ केली, त्याचप्रमाणे एम. एस. पी. साखर दर हा कमीत कमी ३७०० रुपये प्रति क्विंटल ठेवावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
बिपिन कोल्हे म्हणाले, महाराष्ट्रातील तीन पक्षाचे मोठे सरकार एकत्र आले आहे. कोरोना लॉकडाउनच्या काळातही अहोरात्र काम करणारा शेतकरी अतिवृष्टीने मेटाकुटीस आला आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच दिखाव्याचे अश्रु न गाळता खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी तुम्हीच तुमच्या तोंडून म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्याला एकरी पंचवीस हजार रुपये द्या, शेतकरी वाचविण्याची हीच सुवर्णसंधी असल्याचा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपण समारंभ बुधवारी माजी मंत्री शंकरराव कोल्हे, अध्यक्ष बिपीन कोल्हे, संचालक अरुण येवले, कांताताई येवले, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते बुधवारी झाला. याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रेय कोल्हे, प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र सूर्यवंशी, भाजपाचे प्रांतिक सदस्य रवींद्र बोरावके,उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, बाजार समितीचे सभापती संभाजीराव रक्ताटे, भाजपचे जिल्हा उपा्ध्यक्ष शरद थोरात, कैलास खैरे, कामगार नेते मनोहर शिंदे, यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी संजीवनी उद्योग समूह संस्थांचे सर्व संचालक, सभासद कामगार विविध खातेप्रमुख आदी उपस्थित होते.
श्री कोल्हे पुढे म्हणाले की, मागील दोन वर्षे सहकारी साखर कारखानदारी उसाच्या कमी उपलब्धतेमुळे अडचणीत होती. मात्र चालू वर्षी पर्जन्यमान चांगले झाले शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्रात ८६०३२ उसाची चांगल्या प्रमाणात लागवडी केल्या आहेत. देशात यावर्षी तीनशे पाच लाख टन तर पुढील वर्षी ३२५ लाख टन असे विक्रमी साखर उत्पादन होणार आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी सभासद शेतकऱ्यांच्या सहकार्याने अनेक अडचणीवर मात करून मार्गक्रमण करत आहे. तत्कालीन पेट्रोलियममंत्री राम नाईक यांनी साखर उद्योगाला मदतीचा हात देण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यास परवानगी दिली. यंदा अतिरिक्त उसाचे उत्पादन होणार असल्याने १५ लाख टन इथेनॉल निर्मितीसाठी वळवला जाईल. संजीवनी पुढचे सर्व तोटे भरून काढून नव्याने वेगळी झेप घेऊन साखर उद्योगात क्रांती करेल. ऊस गाळप व उतारा वाढवण्यासाठी आपण दोन वर्षापासून केलेल्या अभ्यासातून यांत्रिकीकरण् करून आधुनिकता आणली आहे. बॉयलरचे अपग्रेडेशन केले आहे असेही ते म्हणाले.कोरोना महामारीचे उच्चाटन व्हावे यासाठी संजीवनी कार्यस्थळावर सुसज्ज कोवीड सेंटरचे दसऱ्याला लोकार्पण केले जाईल असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक साखर सर व्यवस्थापक शिवाजी दिवटे यांनी केले. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.





