स्त्री शक्तीचा जागर -मा. आ. स्नेहलता कोल्हे
कोरोनाला हरविणाऱ्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या २३ दिवसाच्या कोरोना संघर्षाचा थरार त्यांच्याच शब्दात
शब्दाकंन – राजेंद्र सालकर
वृत्तवेध ऑनलाईन | 24 Oct 2020,
By: Rajendara Salkar 12.20
By: Rajendara Salkar 12.20
कोपरगाव विधानसभामतदारसंघातील माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे. तेवीस दिवसांत मी मृत्यू जवळून पाहिला. मी जे काही अनुभवलं तशी वेळ कुणावरही येऊ नये, अशी भावना सौ.कोल्हे यांनी कोरोना लढय़ाचे अनुभव सांगताना व्यक्त केली आहे.
कोरोना गंभीर असला तरी सकारात्मक ऊर्जा त्याला हरवते.तुम्ही किती सकारात्मक आहात, त्याचा तुमच्या मानसिकेतवर परिणाम होतो. कोरोना झाला म्हणून घाबरायचे नाही, रडायचे नाही तर लढायचे हा मंत्र घेतलेल्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या कोरोना संघर्षाचा थरार वाचतांना स्त्री शक्तीचा जागर काय असतो याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.
आपला अनुभव सांगताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, मरणाला मी घाबरत नाही, पण लाचारीचे परावलंबी जीवन मान्य नव्हते. समाजासाठी, देशहितासाठी काम करता करता मरण आलं तरी चालेल पण शत्रुराष्ट्राच्या या जैविक अस्त्रापुढे मला हरायचं नव्हतं, हा दृढ विचार मला आतुन लढण्याचं बळ देत होता.
अनेकांच्या मनात आपल्या विषयी खूप प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आदर आहे. विश्वास आहे. तो कुणीही काढून घेऊ शकत नाही. छोटया छोटया प्रत्येक कार्यकर्त्याच्या आठवणीने डोळे भरून येत, कदाचित मलाही माहित नाही. ते माझ्यासाठी देवापुढे प्रार्थना करताहेत. त्यांनाही माहित नाही की मी त्याचे स्मरण करते. परंतु हे ऋणानुबंध असतात,. भावनांची देवाण घेवाण असते. ती दिसतेच असे नाही. सुरूवातीचे दिवस मी फोन घेऊ शकत होते, अनेकांनी ढसाढसा रडून भावनांना वाट मोकळी करून दिली. ताई,तुम्हाला कोरोना झाला,आम्हांला का नाही झाला ? तुमची आम्हांला गरज आहे, तूम्ही पोशिंदा आहात,आमच्या प्रमुख आहात. सर्वांना मी समजावत होते. माझ्या इतकेच तुम्हीही तितकेच महत्वाचे आहे. तुम्ही सर्व काळजी घ्या, म्हणून सांगत होते.
मृत्युच्या दारातुन माघारी येणं काय असतं, याची मी अनुभुती घेतली. अंधश्रध्दा मी मानत नाही, परंतु यमाला जवळून पाहिल्याचे मला जाणवले.असंख्य चहात्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्या,महामृत्युंजय मंत्र जपले, दुवा मागितल्या. याबददल मला कायमच कृतज्ञता राहील.देवाला माझ्या हातुन समाजाची काही राहिलेले सेवाकार्य करून घेणं बाकी असेल तर नक्कीच मला देव नवा जन्म देईल. माझे स्वीय सहायक मेसेजद्वारे लोकांच्या भावभावना, प्रार्थना मला कळवत असत. आपण सर्वांनी माझ्यासाठी मागितलेल्या दुवा कामाला आल्या. संत महंताबरोबरच अनेक राजकीय नेत्यांचे फोन आले. दवा बरोबर दुवाही तितक्याच महत्वाच्या असतात. पाॅझिटीव्ह व्हायब्रेशन मिळाले, हळुहळु प्रकृतीत सुधारणा झाली आणि म्हणतात “ना देव तारी त्याला कोण मारी” याची प्रचीती आली. माझा नवा जन्म झाला आणि तो समाजाला समर्पित असेल. मध्यंतरीच्या काळात ऑक्सिजन’वर असतांना मी मेसेज द्वारे आपल्याशी संवाद साधला, आपले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, सदभावना आपण व्यक्त केल्या. खरोखर खूप मोठा परिवार माझ्याबरोबर आहे. आपल्या सर्वांची खुप आठवण यायची. खुप विचारमंथन झाले, कामाकाजातील अनुभव ,कामाबददलचे प्रयत्न सर्व आठवत असत. तहानभुक विसरून पाच वर्षे केलेल्या धावपळीचा आलेख आठवला. या संपुर्ण २३ दिवसांच्या काळात जीवनातील सामाजिक,राजकीय संघर्षातील अनेक चढउताराची उजळणी झाली.सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतांना बचत गटांच्या महिलांसाठी केलेले काम, महिलांची जागृती, त्यांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न, महिला सक्षमीकरणाचे कार्य, मनाला खुप समाधान देत होते.
रविवार दि. २० सप्टेंबर २०२० रोजी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, तब्बल २३ दिवसाच्या कोरोना विषाणूशी लढाई लढले, आणि जिंकलेही. जन्माला आलेला प्रत्येक जीव हा या जगातून जाणार हे सत्य आहे. परंतु अशा पध्दतीने जगाचा निरोप घेणं मला पसंद नव्हते. त्यामुळे मी हिंमत धरून या संकटाचा प्रतिकार करत होते. माझ्यावर सुरू असलेला औषधोपचार आणि ऑक्सीजन च्या साह्याने या आजाराशी माझे युध्दच सुरू होते. स्वतःला सावरत प्रतिसाद देत होते. या विषाणूला हारवायचचं ही जिद्द मनात ठेवून मी हा लढा भक्कम करीत होते. या मोठया महामारीच्या आजाराच्या संकटातून माझा जीव वाचला, यापुढे अनेक कामे बाकी आहे, ती मार्गी लावता येतील म्हणून मी आनंदी आहे, पण त्याच बरोबर चीन सारख्या आपल्या देशाच्या शत्रू राष्ट्राने त्यांच्या विकृत राक्षसी प्रवृत्तीच्या विचारातून निर्माण केलेल्या जैविक अस्त्राचा मी पराभव केला, याचा मला जास्त आनंद झाला.
नाशिक येथील सुश्रृत हाॅस्पीटलमध्ये डाॅ. प्राची पवार याच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते, उपचार सुुरू असतांनाच मुंबईहून माझे दीर डाॅ. मिलींद कोल्हे यांच्या कन्या डाॅ गौतमी स्वतः ड्राईव्ह करत नाशिकला आली. पीपीई किट घालुन माझ्यासमोर उभी राहिली. खूप आनंद झाला. मुंबईमध्ये कुपर हाॅस्पीटलमध्ये मेडीकल आॅफीसर व कोविड योध्दा म्हणून रात्रंदिवस काम करत आहे. खूप अभिमान वाटला, लेकीच्या कामाचा. मुलगा काय आणि मुलगी काय, अजुनही लोक बुरसटलेल्या संकुचित विचारांचे. केवढया धाडसाने मुली नोकरी करतात. याचे कौतुक वाटले. स्वतःचे हाॅस्पीटल असुन मुंबई मनपाच्या कुपर हाॅस्पीटलमध्ये रूग्णसेवा करत आहे. पुढे आणखी शिकण्याची धडपड, स्वप्न साकारण्यासाठी झेप घेण्याची तीची उमेद मनाला उभारी देउन गेली. परमेश्वर तीच्या पंखाना खुप बळ देवो, तिच्या हातुन रूग्णसेवा,समाजसेवा घडो. असा आशिर्वाद
तिला दिला. काकी, तुम्ही या संकटातूून नक्कीच बाहेर याल,अशी हिंमत देऊन गेली.
खुप विचारमंथन झाले, कामाकाजातील अनुभव ,कामाबददलचे प्रयत्न सर्व आठवत असत. तहानभुक विसरून पाच वर्षे केलेल्या धावपळीचा आलेख आठवला. या संपुर्ण २३ दिवसांच्या काळात जीवनातील सामाजिक राजकीय संघर्षातील अनेक चढउताराची उजळणी झाली.सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतांना बचत गटांच्या महिलांसाठी केलेले काम,महिलांची जागृती, त्यांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न, महिला सक्षमीकरणाचे कार्य, मनाला खुप समाधान देत होते. परंतु त्याचबरोबर राजकारणाचे कुटील डाव, खोटे अपप्रचार, टीका टिप्पणी, मला पाडण्याचे सर्वांनी वेगवेगळया मार्गाने रचलेले पडयंत्र ,त्यासाठी झालेले आर्थिक व्यवहार, सोशल मिडीया एका स्त्रीला पाडण्यासाठी रचलेले षडयंत्र, मला पाडण्याचे स्वप्न पुर्ण करून पदरात माप पाडुन घेण्याचे किळसवाणे राजकारण, निवडणुकीनंतर समजलेली सर्व कटकारस्थाने राजकीय षडयंत्र याचीही उजळणी झाली. या मूठभर लोकांचा काय विचार करायचा अशा प्रवृत्ती सर्वत्र आहेत . हे सत्य समोर आले या सर्वांचे विचारमंथन झाले.
वैदयक शास्त्रानुसार ऑक्सिजन गरजेचा होता, पण माझ्या जीवनात माझे कार्यकर्ते, सहकारी, दिनदलित, गोरगरीब जनता हाच माझा महिला बचत गट हाच प्राणवायु आहे. हे माझ्या लक्षात आले.
कौटुंबिकदृष्टया म्हणाल, तर मला कोरोना डिटेक्ट झाल्यावर प्रथम काळजी वाटली ती मोठेसाहेब आणि माईंची . घरातील वडीलधारी माणसं ही या घराची संपत्ती आहे. जेवढे जपता येईल तेवढे जपलेच पाहिजे. त्यांच्याविषयीची कृतज्ञता कायम मनात असते. आई आजारी झाली आॅक्सीजनवर असतांना वडीलांनाही कोरोना डिटेक्ट झाला, दोन्हीही मुले मनातुन थोडे हालले, माई,बाबा, काका,काकी परीवारातील बाकीच्या सर्वांनी त्यांना धीर दिला. विवेकने राजकीय, सामाजिक, शेती, कारखाना, कार्यकर्त्यांचे प्रश्न, मतदार संघातील इतर कोरोना रूग्णांकडे लक्ष देण्याचे काम जबाबदारीने हाताळले.
छोटा मुलगा इशान मला ऑक्सिजन सुरू झाला, तसा रोज २३ दिवस डबा पोहचवणे, हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांच्या संपर्कात राहून काळजी घेणे बघत होता. ब-याचदा हाॅस्पिटलच्या बाहेर उभा राहत असे. माझ्या बहिणीचा मुलगा गौरव त्याला आधार देत,हिंमत देत होता. रूग्णालयात असतांना खुप एकटेपण जाणवायचे, प्रचंड थकवा सतत १८ दिवस रात्रंदिवस ऑक्सिजन लावुन कोरोनाशी झुंज सुरू होती, डिस्चार्ज मिळाला त्या दिवशी डाॅक्टर,नर्सेस यांचे आभार मानले. त्याचबरोबर सुश्रृत हाॅस्पीटलच्या प्रमुख डाॅ. प्राचीताई पवार त्यांची पती डाॅ. अनिल यांचेही मनपुर्वक आभार मानले. वैद्यकिय उपचाराबरोबर भावनिक, मानसिक आधार दिला. नवा जन्म झाला, हाॅस्पीटलच्या सर्व कोविड योध्दयांना हात जोडून नमस्कार करून गाडीत बसले, तेव्हां कुठे आकाश, माणसे आणि निसर्गाचे दर्शन झाले. घराच्या दिशेने निघाले, मतदार संघातील कार्यकत्यांनी पुष्प वर्षावांनी स्वागत केले, मन भरून आले. मतदार संघाच्या भुमिला नतमस्तक झाले. त्यांच्याशी संवाद साधला, सर्वांचे आभार मानुन घरी पोहचले. गेटपासून फुलांच्या पायघडया टाकलेल्या होत्या, दादा बरोबर घराकडे प्रवेश केला. परिवारातील आदरणीय माई, नितीनदादा, काकी, विवेकभैया, सुमितभैया,अमितदादा, सुना, नातवंडे, यांनी स्वागत केले. मन भरून आले सर्वांनी पुष्पवर्षा करून माईंनी औंक्षण केले. सुन रेणुकाने दारापुढे सुंदर रांगोळी घातली होती. मी आल्याचे कळल्यावर आदरणीय मोठेसाहेब,भाउ बंगल्यातुन बाहेर आले. खुप समाधान त्यांच्या चेह-यावर दिसले. मी दुरून नमस्कार केला, मला त्यांनी आशिर्वाद दिले, म्हणाले तुला भेटल्यानंतरच मी जेवायला बसणार होतो. डाॅ. प्राचीताईंकडून चौकशी करायचो, बरे झाले तु या संकटातुन बाहेर पडलीस. माझ्या डोक्यावर हात ठेवुन मला आशिर्वाद दिला, मन खुप भरून आले.
मी भाग्यवान आहे, एवढी प्रेमाची माणसे आजुबाजुला आशिर्वादासाठी असतात म्हणुनच अशा वादळातुन आपण बाहेर पडतो याची प्रचीती आली.
एकीकडे कोरोना झालेल्या रुग्णांना बरे करण्यासाठी लढणारे कोरोना योद्धे तर दुसरीकडे स्वतःला कोरोना झाल्यानंतर या कोरोना विषाणू बरोबर लढणारे धाडसी कोरोना योद्धे जर ती स्त्री असेल तर खरोखर हाच स्त्रीशक्तीचा जागर म्हणावा लागेल.