हिवाळ्यात पाणीपुरवठा ६ दिवसांवर ! काय राव टिंगल करता काय?

हिवाळ्यात पाणीपुरवठा ६ दिवसांवर ! काय राव टिंगल करता काय?

Water supply on 6 days!

RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 5 Dec 2020, 10:30:00 AM

कोपरगाव : गेल्या अनेक वर्षांपासून “पाचवीला पुजल्याप्रमाणे’  कोपरगाव शहरवासींना पाण्याच्या बाबतीत कुठल्या ना कुठल्या कारणाने मनस्ताप सहन करावा लागतो. गेल्या काही वर्षांपासून कोपरगाव पालिकेकडून ४ दिवसाआड मिळणारे पाणी आता भर हिवाळ्यात ६ दिवसांवर गेल्याने पाण्याचा विविध कामांसाठी कसा वापर करावा, असा यक्ष प्रश्न शहरवासींसमोर उभा ठाकला आहे. कोपरगाव पालिका प्रशासनाच्या योग्य नियोजनाअभावी व दुर्लक्षितपणामुळे हा प्रकार सुरू असून नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या साठवण तलावातील अत्यल्प पाणीसाठा व शहराला दारणा धरणातून पाणी आवर्तन मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेता पालिकेने पुन्हा पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. आता सहा दिवसाआड एकवेळ पाणीपुरवठा केला जाणार असल्याने हिवाळ्यात शहरवासीयांसमोरील पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहिले आहे. हिवाळ्यात पाणीपुरवठा ६ दिवसांवर ! काय राव टिंगल करता काय? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

कोपरगाव शहराला मिळणाऱ्या पाणी आवर्तनाला उशीर होत आहे. अगोदरच पाणीटंचाईच्या फेऱ्यात सापडलेल्या कोपरगाव शहरवासीयांसमोरील चिंता अधिकच वाढली आहे. त्यातच शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पालिकेच्या साठवण तलावात पाण्याचा साठा दिवसेंदिवस खाली खाली जात असल्याने पालिकेला  पाणीकपात करावी लागत आहे. कोपरगाव पालिकेचे नगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापती व मुख्याधिकारी यांनी पालिकेच्या साठवण तलावाला भेट देत साठवण तलावात शिल्लक असलेल्या पाणीसाठ्याचा आढावा घेतला. सध्या साठवण तलावात काही घनफूट इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे पालिकेने आज (७ डिसेंबर) पासून शहरवासीयांना सहा दिवसाआड एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.

पाणीकपात कोपरगावकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे.

कधी धरणात पाणी नाही धरणात पाणी आहे तर दारणा धरणातून पालिकेला मिळणाऱ्या पाणी आवर्तनास विलंब होत चालल्याने कोपरगाव पालिकेला पाणीकपात करावी लागली आहे. गेली अनेक वर्ष पाण्याचा हा लपंडाव कोपरगावकरांना सोसावा लागत आहे. गेली अनेक वर्षे कोपरगावकरांना चार दिवसाआड पाणी मिळत असते याचा अर्थ महिन्याला आठ तर वर्षाला एकशे चार पाणी मिळतात परंतु त्यातही आता हिवाळ्यात सहा दिवसांआड पाणी म्हणजे आठवड्यातून एकदा महिन्याला चार पाणी उन्हाळ्याची बोंबाबोंब विचारूच नका,  दिवसाआड पाणी हे कोपरगावकरांसाठी स्वप्न ठरलेले आहे.  प्रत्येकाने कोपरगाव शहराच्या पाणीप्रश्नावर राजकारण केले परंतु गेल्या पंचवीस तीस वर्षात कोणत्याही नेत्याला कोपरगाव  शहराची पाणी समस्या सोडवता आली नाही हे दुर्दैव ! याला कारण श्रेयवाद व प्रत्येक गोष्टीत राजकीय खोडा!

कोपरगाव शहराला स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी तत्कालीन सभापती स्वर्गीय ना.स. फरांदे यांच्या मदतीने भारनियमनावर मात होऊ शकते. म्हणून त्यावेळी फिडर एक्‍स्प्रेसची निर्मिती केली. टोकाचा विरोध असतानाही आहे त्या परिस्थितीत  त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत स्वच्छ आणि वेळेवर नियमित पाणी दिले. त्यानंतर भविष्यातील २५ वर्षाचा वेध घेऊन कोपरगाव शहरासाठी मोठ्या दिमाखात  बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ४७ कोटीची पाणी योजना आली, काम झाले पण ट्रायल न घेताच ठेकेदाराला पैसे देऊन मोकळे केले, .( ट्रायल न झाल्यामुळे ती पूर्ण झाली आहे किंवा नाही हे निश्चित सांगता येणार नाही.) , तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी युती सरकारच्या मदतीने  व श्री साईबाबांच्या कृपेने निळवंडे पाईपलाईन कोपरगाव पर्यंत आणण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले, परंतु राजकीय श्रेयवादात ते अडकून पडले. आमदार आशुतोष काळे यांनी समृद्धी महामार्ग ठेकेदार गायत्री कंपनीच्या सहकार्याने पाच नंबर साठवण तलावाचे खोदकाम केले निधीअभावी काम अर्धवट राहिले त्यांचा सातत्याने पाठपुरावा चालू आहे.

आता पुन्हा पालिकेच्या निवडणुका आल्या की ही बाब प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात असते. निवडणुका संपल्या की परत “ऑल इज वेल’; पण ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आजवर आलेल्या लोकप्रतिनिधींची त्याकडे पावलेच पडली नाही, आणि पडली तरीही राजकीय श्रेय वादामुळे  नेत्यांची  ती लढाई  अर्धीमुर्धी ठरली ही खरी शोकांतिका आहे.

तांत्रिक कारणामुळे दिवसाआड पाणी देऊ शकत नाही-

नवीन साठवण तलाव बांधले, यात पाणी भरले, तरी कोपरगाव शहराला दिवसाआड पाणी देता येणार नाही कारण कोपरगाव शहरामध्ये असलेल्या वॉलची संख्या इतकी आहे की ते सर्व वॉल पूर्णपणे सोडण्यासाठी किमान चार दिवसाचा अवधी लागतो. या तांत्रिक कारणामुळे कितीही सुविधा झाल्या तरी कोपरगाव शहराला दिवसाआड पाणी देता येणार नाही.- प्रशांत सरोदे
मुख्याधिकारी, नगरपालिका

वृत्तवेध ऑनलाइनवर घ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स

आपली प्रतिक्रिया कळवा

Leave a Reply

You cannot copy content of this page