महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर; कोपरगावात २९ ग्रामपंचायती निवडणूका 

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर; कोपरगावात २९ ग्रामपंचायती निवडणूका
Kopargaon Gram Panchayat Elections

कोपरगाव : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होत आहेत.

करोना काळात निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासकराज आता संपुष्टात येणार आहे. मुदत संपलेल्या राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे .

त्यानुसार १५ जानेवारीला मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. यावर्षीच्या एप्रिल ते जून या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका करोनामुळे होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे तेथे प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली. त्यावरूनही राजकारण पेटले होते. प्रकरण कोर्टातही गेले होते. त्यानंतर आता करोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे.

१० डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर कोपरगाव मतदार संघातील उक्कडगाव, तिळवणी, अंजनापुर, घारी, मनेगाव, मळेगाव थडी, सांगवी भुसार, वेळापूर, जेऊर पाटोदा, काकडी म.,नाटेगाव, कासली, ओगदी, आंचलगाव, कोळगाव थडी, मायगाव देवी, हिंगणी, रवंदे, संवत्सर, देर्डे चांदवड, मढी खुर्द, मढी बुद्रुक, धोंडेवाडी, सोनारी, आपेगाव, येसगाव, टाकळी, कोकमठाण, जेऊर कुंभारी या २९ ग्रामपंचायतींचा त्यापुढील प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

नोटीस मंगळवारी १५ डिसेंबरला प्रसिद्ध झाली, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख बुधवार २३ डिसेंबर ते बुधवार ३० डिसेंबर पर्यंत सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत मात्र २५,२६,२७, डिसेंबर हे तीन दिवस सुट्टीचे वगळून राहणार आहे, अर्ज छाननी गुरुवारी ३१ डिसेंबर रोजी ११ वाजेपासून, सोमवारी ४ जानेवारी सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत, ४ जानेवारी दुपारी ३ वाजेनंतर चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल, मतदान शुक्रवारी १५ जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राहील, मतमोजणी सोमवारी १८ जानेवारी
रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सकाळपासून सुरू होईल. अशी माहिती कोपरगाव तहसीलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली त्यांना मदत म्हणून निवडणूक शाखा अधिकारी अरुण रणनवरे हे काम करीत आहेत .

त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देत असताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करत असताना ग्रामीण भागात निवडणुकांची जोरदार धामधूम पाहायला मिळणार आहे. करोना संबंधीच्या नियमांचे पालन करून निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने अखेर ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली असून नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर आता गावागावातही राजकारण तापणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page