मटन मार्केटकडे जाणार्‍या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवा

मटन मार्केटकडे जाणार्‍या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवा

Install a paver block on the road leading to the mutton market

RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 22 Dec 2020, 18:30:00

कोपरगाव : मटन मार्केटकडे जाणार्‍या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.या वरील समस्यांसह परिसरात स्वच्छता करण्याची मागणी सुद्धा परिसरातील दुकानदार व मटन मार्केट व्यावसायिकांनी केली आहे .

शहरातील मटन मार्केटच्या दिशेने जाताना रस्त्याच्या मध्ये  सातत्याने असलेला चिखल सांडपाणी यातुन मार्ग काढण्यासाठी ग्राहकांना सर्कस करावी लागते, काही दिवसांपूर्वी याठिकाणी गटारीचे काम झाले मात्र ते निकृष्ट दर्जाचे झाल्याने तेथे टेकाड झाले आहे. गर्दीच्या वेळी ग्राहकांना अडखळत चालावे लागते.

माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी खाटीक गल्लीतून मोठ्या हिमतीने मटन मार्केट हलवून कहार गल्लीतील लोकांचा श्वास मोकळा केला. मटन मार्केट काढल्यानंतर त्या खाटीक दुकानदारांना वाऱ्यावर न सोडता त्यांचे पुनर्वसन करताना बस स्थानकाच्या बाजुला कोणालाही त्रास होणार नाही. अशा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बसविले, परंतु त्यांच्यानंतर गेल्या पंधरा-वीस वर्षात कुठल्याही नगराध्यक्षांनी किंवा नगरसेवकांनी  या मटन मार्केटच्या  लोकांना सुविधा देण्याबाबत पुढाकार घेतला नाही. किंवा तसे प्रयत्नही केला नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. शहरातील सर्व स्तरातील लोक या ठिकाणी मटन घेण्यासाठी येत असतात. त्या ठिकाणी स्वच्छता व रस्ता असणे गरजेचे आहे. ती पालिकेची जबाबदारी आहे. परंतु पालिकेला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, गेल्या वर्षभरात शहरातील प्रत्येक प्रभागात व शहरातील  गल्लीबोळात व काही ठिकाणी सिमेंट चा रस्त्यावर  पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. प्रचंड आर्थिक उलाढाल झाली वर्तमानपत्रात अनेक वेळा बातम्या आल्या परंतु  याबाबत कोणीही ब्र शब्द बोलण्यास तयार नाही. एकदा या पेव्हर ब्लॉकचे ऑडिट झाले पाहिजे. मात्र ज्या ठिकाणी पालिका कर वसूल करते त्या लोकांना  आवश्यक असणाऱ्या व गरज असलेले मटन मार्केट कडे दुर्लक्ष केले जाते. सार्वजनिक व मूलभूत सुविधा पुरविणे हे पालिकेचे दायित्व असते याचा जणू त्यांना विसर पडला की काय ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही. या ठिकाणी असलेल्या अतिशय वर्दळीच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत शिवसेनेचे माजी शहरप्रमुख असलम शेख यांनी सातत्याने गेल्या वर्षभरापासून पालिकेकडे तक्रार केली आहे. परंतु, कार्यवाही झालेली नाही.

आतातरी याची गांभीर्याने नोंद घेऊन पालिकेने त्वरित पेव्हर ब्लॉक बसविण्यात यावेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मुन्नाभाई मन्सुरी यांनी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page