समता पतसंस्थेचा १००० कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसायाचा टप्पा पार – संदीप कोयटे
Samata Patsanstha crosses Rs 1000 crore composite business stage – Sandeep Koyte
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 31 Dec 2020, 17:00:00
कोपरगाव : महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या समता नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ १३ शाखांच्या आधारे ३१ डिसेंबर २०२० अखेर १००० कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण करत, संपूर्ण महाराष्ट्रात नागरी सहकारी पतसंस्थांमध्ये (मुंबई वगळता) प्रथम क्रमांक मिळविला आहे. ‘विश्वास+सुरक्षितता = समता या ब्रीद वाक्यानुसार समताने आपली वाटचाल प्रगतीपथाकडे चालू ठेवली आहे. ग्राहक, सभासद यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची चांगल्याप्रकारे सेवा देत असल्यामुळेच व ग्राहकांचा समतावरील असलेल्या अतूट विश्वासामुळेच समताला महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये संमिश्र व्यवसायाचे बाबतीत उच्चांक गाठता आला.’अशी माहिती समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी दिली.
संदीप कोयटे पुढे म्हणाले, समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला शिस्त लावुन, ‘आपणास जे जे ठावे, ते ते इतरांना शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन’ या उक्ती प्रमाणे केवळ समता पतसंस्थेमध्येच आपल्या ज्ञानाचा उपयोग न करता महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ सुदृढ झाली पाहिजे, वाढली पाहिजे या भावनेने काम करीत असतात. १००० कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसायाचा टप्पा गाठताना १३ शाखांच्या आधारे ५७० कोटी रुपयांच्या ठेवी मिळवून प्रतीशाखा ४४ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा व ७७ कोटी रुपयांचा प्रतीशाखा संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण करून समताने महाराष्ट्रात उच्चांक केला. तसेच समताने सोनेतारण व्यवसाय वाढविण्यावर विशेष भर दिला असून ३१ डिसेंबर २०२० अखेर ८५ कोटी रुपयांचे सोने तारण कर्ज व ३५० कोटी रुपयांचे इतर सुरक्षित कर्ज वाटप करून ठेवीदारांची सुरक्षा कायम राखली आहे. कोरोना या संसर्गजन्य महामारीमुळे जाहीर झालेल्या लॉक डाऊन काळात सुद्धा गेल्या सहा महिन्यात तब्बल ४० कोटी रुपयांनी समताच्या ठेवींमध्ये वाढ झाली असल्याची माहिती समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक जितुभाई शहा व सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी दिली. लिक़्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाच्या आधारे तब्बल ७०,००० ठेवीदारांपैकी ६३,००० ठेवीदारांच्या म्हणजेच ९८ टक्के ठेवीदारांच्या ६.५० लाख रुपया पर्यंतच्या ठेवी अतीसुरक्षित केल्या आहेत. उर्वरित २ टक्के ठेवीदारांच्या ठेवी देखील सुरक्षित कर्ज वितरण व कठोर वसुली याद्वारे सुरक्षित आहेत. १ जानेवारी २०२१ पासून क़्यु.आर कोड, यु.पी.आय. सिस्टीम द्वारे भारतातील कोणत्याही बँकेत जमा असलेल्या ग्राहकाचे पैसे समता पतसंस्थेच्या सभासद ग्राहकांच्या खात्यात जमा होऊ शकतील. या अत्याधुनिक सुविधांव्यतिरिक्त सेवा निवृत्त व जेष्ठ नागरिकांना घर पोहोच सेवा तसेच शुअर सेल, शुअर पेमेंट हि व्यापाऱ्यांसाठी सुरु केलेली अभिनव सेवा तसेच मोबाईल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, ऑनलाइन समता रिकव्हरी सिस्टीम, ऑप्टीमायझर यंत्रणेद्वारे सुसज्ज असेलेले ‘रेकॉर्ड रूम’ अशा अभिनव प्रकारच्या यंत्रणा उभारून समता पतसंस्थेने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतातील पतसंस्था चळवळीत सभासद व ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रामाणिक सेवा देत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.