सरपंच पदाचा लिलाव ही लोकशाही व संविधानाची थट्टा – विजय वहाडणे
The Sarpanch auction is a mockery of democracy and the constitution- Vijay Wahadane
या दुष्टचक्रात अडकून लोकशाहीचे धिंडवडे निघणार
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 2 Jan 2021, 19:00:00
कोपरगाव : पदावर बसून प्रचंड माया जमवायची व पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत तोच पैसा वापरून पुन्हा सरपंचपद विकत घ्यायचे. या दुष्टचक्रात अडकून लोकशाहीचे धिंडवडे निघणार असतील तर शासनानेच अशा प्रकरणांना आळा घालणे गरजेचे आहे.कारण सरपंच पदाचा लिलाव ही लोकशाही व संविधानाची थट्टा असल्याची संतप्त प्रतिक्रिया नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धीपत्रकातुन व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावाला २५-३० लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले जात आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना वहाडणे यांनी आपला संताप पत्रकातून व्यक्त केला.
वहाडणे पुढे म्हणाले, काही ठिकाणी तर सरपंच पदाची बोली लावून लिलाव करण्याचे उद्योग सुरू आहेत. समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी ही अशा गैरप्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लिलाव पद्धतीमुळे लोकशाहीची कुचेष्टा च होत आहे. वर्षानुवर्षे जनतेच्या मानगुटीवर बसलेलेच पैशाचा वापर करून पडद्याआड राहून पदांचा कब्जा घेणार यात शंका नाही. सरपंच पदाचा लिलाव झाला तर सर्वत्र वाळूचोर, अवैध व्यवसाय करणारे,नेत्यांचे भाटच सरपंच पदावर बसतील व ग्राम विकासासाठी येणाऱ्या योजना, प्रचंड निधी खिशात घालून लिलावात गुंतविलेले पैशांची वसुली करतील. सरपंच येणाऱ्या निवडणुकीत तोच पैसा वापरून पुन्हा सरपंचपद विकत घ्यायचे, संपूर्ण जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा आत्मा पवित्र ” मतदान ” आहे. पण मतदारांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे.ठराविक धनाढ्य प्रवृत्तीची मनगटशाही मतदारांच्या माथी मारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांवाचा रात्रंदिवस गजर करणाऱ्या नेत्यांना घटनेचा विसर पडलेला दिसतो. अपवाद म्हणून (तशी परिस्थिती ओढवली असेल तरच) एखाद्या ठिकाणी असे करायला हरकत नाही. असेही त्यांनी शेवटी पत्रकात म्हटले आहे.