” मै भी डिजिटल” पथविक्रेत्यांना डिजिटल आर्थिक साधने वापरण्याचे प्रशिक्षण संपन्न- सरोदे
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 7Jan 2021, 16:30:00
कोपरगाव: कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात बुधवारी ६ रोजी डिजिटल आर्थिक साधने वापरण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.अशी माहिती नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली.
शहरातील पथविक्रेत्यांना खेळते भांडवल मिळावे या दृष्टीकोनातून सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ( पीएम स्वनिधी) योजनेनुसार डिजिटल साधनाचा वापर केल्यावर पथविक्रेत्यांना कर्जाच्या रक्कमे व्यतिरिक्त कॅश बॅक प्राप्त होणार आहे.
केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, पीएम स्वनिधी योजनेचा लाभ मिळालेल्या बहुतांश लाभार्थ्यांना डिजिटल पेमेंट साधनाचा वापर करता येत नसल्यामुळे त्यांना औपचारिक अर्थव्यवस्थेत समावेशन करणे बाबत अडचणी निर्माण झाल्याचे आढळून आले आहे. याचा परिणाम सदर लाभार्थ्यांना कर्जाच्या रक्कमे व्यतिरिक्त कॅश बॅक प्राप्त होण्यासाठी होत आहे. सदर बाब ही योजना अमलबजावणीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य नसल्या कारणाने पथविक्रेत्यांना डिजिटल साधनाचा वापर करणेबाबत अवगत करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी दि.४ ते २२ जानेवारी २०२१ दरम्यान “मै भी डिजिटल” ही मोहीम राबविण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
बुधवारी ६ रोजी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात डिजिटल आर्थिक साधने वापरण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत वितरीत केलेल्या एकूण २० लाभार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. सदर प्रशिक्षण देणे कामी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया बँकेचे शाखा व्यवस्थापक अभिषेक कुमार उपस्थित होते. याप्रसंगी कर्ज वितरीत झालेल्या लाभार्थ्यांनी “मै भी डिजिटल” यामोहीमेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त डिजिटल आर्थिक व्यवहार करून आपला फायदा करून घेण्यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे आणि मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी उपस्थितांना आवाहन केले आहे.
प्रशिक्षण यशस्विततेसाठी शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट, रामनाथ जाधव, मार्केट विभागाचे राजेंद्र गाढे, चंद्रकात साठे आदीनी परिश्रम घेतले.