कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीचे ८२.१८ % मतदान शांततेत

 कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीचे ८२.१८ % मतदान शांततेत

82.18% polling of 29 gram panchayats in Kopargaon taluka is peaceful

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 15Jan 2021, 19:00:00

कोपरगाव : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या २७२ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ६११ उमेदवारांचे राजकिय भवितव्य आज मतदार संघातील ५२,४९३ मतदारांनी मतपेटीत बंद केले. मतदानाची वेळ संपली तेंव्हा तालुक्यातील ८२.१८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची
माहिती राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली. निवडणुक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीचे कार्यकाळ संपल्याने सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. २३ डिसेंबर २०२० ते ३० डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करणे, ४ जानेवारी २०२१ उमेदवारी अर्ज मागे घेणे, १५ जानेवारी प्रत्यक्ष मतदान आणि १८ जानेवारी निकाल असा निवडणुक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता.

निवडणुका जाहीर झालेल्या २९ ग्रामपंचायतींपैकी ७ उमेदवार बिनविरोध झाल्याने आज २९ ग्रामपंचायतीच्या २७२ जागांसाठी प्रत्यक्ष निवडणुक प्रक्रिया राबविण्यात आली. या करता ६११ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. एकुण मतदार संख्या ६३८७२ मतदार पुरुष ३२८८७ स्रीया ३०९८५ मतदार आहेत. पैकी ५२४९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात पुरुष २७४६३ स्रीया ३२५०३० मतदार यांचा समावेश आहे.

आज सकाळी ७.३० वाजता २९ ग्रामपंचायतींच्या १११ मतदान केंद्रावर शांततेत निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांची बऱ्यापैकी गर्दी झाल्याचे चित्र होते. मात्र दुपारी मतदान केंद्रावरील गर्दी काहीशी रोडावली होती.

सकाळी साडेसात ते दुपारी दीड वाजेपर्यंत. सहा तासांत ५२.०६ % मतदान झाले होते. यात पुरूष १७२४७ (५२.४४%) स्त्रिया १६००६ (५१.६६%) एकूण ३३२५३ (५२.०६ %) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला,दुपारी दीड ते साडेतीन वाजेपर्यंत. दोन तासांत १८.१६ % मतदान झाले होते. यात पुरूष ५६९९ (४९.३०%) स्त्रिया ५९०२ (५१.०६%) एकूण ११६०१ (१८.१६ %) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एकूण मतदान ७०.२२% झाले होते. तर साडे तीन ते पाच वाजेपर्यंत या शेवटच्या टप्प्यात ११.९६ % मतदान झाले होते. यात पुरूष ४५१७ (५०.९०%) स्त्रिया ३१२२ (४०.१०%) एकूण ७६३९ (११.९६ %) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने ८२.१८ % मतदान झाले.

निवडणूक प्रक्रिया यशस्वीतेसाठी निवडणूक नायब तहसिलदार प्रशांत गोसावी, माधवी गोरे,मनिषा कुलकर्णी, अरुण रणनवरे, यांचे सह विविध खातेनिहाय अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, पोनि. दौलतराव जाधव, पोनि.प्रविण लोखंडे,स्पेशल नेमणूक पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे सह निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी निवडणूक प्रक्रिया सुलभतेने होणे कामी विशेष लक्ष ठेवून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. राजकिय दृष्ट्या संवेदनशिल मानल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुक प्रक्रियेवर पोलिसांनी करडी नजर ठेवली होती.

Leave a Reply

You cannot copy content of this page