हे तर जनतेला अंधारात ढकलण्याचे पातक ; या सरकारला आम्ही मनमानी करू देणार नाही.-सौ स्नेहलता कोल्हे
We will not allow this government, which has committed the sin of pushing the people into darkness, to act arbitrarily. – Mrs. Snehalta Kolhe
महावितरण कार्यालयावर भाजपचे टाळे आंदोलनBJP’s lock agitation at MSEDCL office

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 5Feb 2021, 2 :00
कोपरगाव : कोरोना काळात जनतेला वीज बिलमाफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहेत. थकीत बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार असंवेदनशील आहे. सत्तेनंतर मग्रुरी अंगात आल्याने विज कट करून जनतेला अंधारात ढकलण्याचे पातक करणाऱ्या या सरकारला आम्ही मनमानी करू देणार नाही.असा इशारा भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आंदोलन प्रसंगी दिला आहे.

राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित मागे घ्यावा, अन्यथा ५ फेब्रुवारीला भाजपचे कार्यकर्ते राज्यभर महावितरण कार्यालयांना टाळे ठोकतील, तसेच वीजपुरवठा खंडित करण्यास येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अटकावही करतील, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत जाहीर केले होते.यावर भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ५ रोजी मोर्चाने संपर्क कार्यालयापासून जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कोपरगाव येथे रस्त्यावर उतरून वीज वितरण कार्यालयासमोर भाजपच्यावतीने सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात आले, त्यावेळी सौ.कोल्हे बोलत होत्या. सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, फडणवीस सरकारच्या काळात आम्ही कधीच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. यामुळे थकबाकी वाढली तरी तो भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. आमचे राज्य असताना कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीजजोडण्या दिल्या. पण वीज कंपन्यांही फायद्यात राहिल्या होत्या. जर आम्हाला हे शक्य होते तर आताच्या सरकारला का कठीण आहे,असा सवालही सौ. कोल्हे यांनी केला. १०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याची ऊर्जा मंत्र्यांची घोषणा म्हणजे खोटे आश्वासन असून “बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी” आहे दिल्लीतील शेतकर्यांबद्दल कळवळा दाखविणारे व राज्यातील शेतकऱ्यांची वीज कट करणाऱ्या आघाडी सरकारची ही कृती म्हणजे दोन्ही कडूनही ढोलकी बडविणारी असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांबाबत शरद पवारांचे धोरण राज्यात एक आणि देशात एक असे दुटप्पी धोरण असून हे म्हणजे वाहत्या गंगेत हात धुऊन राजकीय पोळी भाजण्यासारखे आहे, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील द्वेषापोटी शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधणारे हे कृत्य राजकीय षडयंत्र असून यामागे देश विघातक प्रवृत्ती आहेत. परवा आझाद मैदानावर भेंडी बाजारातील जनता गोळा केली तर जमिनी देतो म्हणून आदिवासींना फसवून आणले होते. यां अपप्रवृत्तींना शेतकऱ्याचा कळवळा नाही, तर यापेक्षा यांना आपापले झेंडे आणि टेंबे मिळविण्याचे हे आंदोलन होते अशी टीकाही त्यांनी केली. ज्या मोदींनी सामान्य जनतेच्या चुलीपर्यंतचा विचार केला. महिलांच्या धूर मुक्तीसाठी घराघरात १०० रुपयात गॅस सिलेंडर पोहचवला, त्या मोदींना आज देशाच्या सीमेवर लढण्याबरोबरच घरातही लढावे लागते हे या देशाचे दुर्दैव आहे, आणि याच प्रवृत्तीचा मी येथे निषेध करते. सौ. कोल्हे म्हणाल्या, निळवंडे च्या पाण्याचा थेंबही कोपरगावला जाऊ देणार नाही असे जाहीर वक्तव्य ज्यांनी केले व कोर्टकचेऱ्या करून त्यांनीच कोपरगावचे पाणी घालवले, अशांच्या निवडणुकीतील खोट्यानाट्या भूलभुलैयाला शहरातील जनता फसली, आणि मते देऊन बसली, आजही शहराला आठवड्यातून एकदाच पाणी आहे, दीड वर्षात साठवण तलाव खोदण्यापलीकडे आणि डांगोरा पिटण्यापलीकडे यांनी काहीच केले नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.
त्या पुढे म्हणाल्या, गोदावरी कालवे आवर्तनाची बैठक मुंबईत मंत्रालयात होवो अथवा , मतदार संघात याला महत्त्व नाही, आवर्तने किती व कधी मिळाली ? हे महत्त्वाचे आहे, आज धरणात पाणी असूनही पाच आवर्तनाऐवजी केवळ तीनच आवर्तने मिळाले ही वस्तुस्थिती आहे, याला जबाबदार कोण ? मग शेखी कशाची मिरवता ? असा सवालही त्यांनी केला. अधिकाऱ्यांनो ज्यांनी तुम्हाला दिवाळीला अंधारात ठेवले त्या सरकारचे ऐकून लोकांची वीज तोडू नका, पठाणी वसुली थांबवा, अन्यथा जनता पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही सौ. स्नेहलता कोल्हे यांनी शेवटी दिला. यावेळी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, शहराध्यक्ष दत्ता काले शिल्पा रोहमारे, अरुण येवले, स्वप्निल निखाडे, विजय वाजे,अविनाश पाठक, बाळासाहेब पानगव्हाणे, बबलू वाणी, प्रदीप नवले, नगरसेवक -नगरसेविका, भाजपा पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
साहेबराव रोहोम, केशवराव भवर, खालिद कुरेशी, एल.डी. पानगव्हाणे, विनोद राक्षे, जितेंद्र रणशूर, विक्रम पाचोरे, मच्छिंद्र पा. टेके यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन सुशांत खैरे यांनी केले पोलिसांनी बंदोबस्त चौख ठेवला होता.





