नाकाबंदी : कोपरगावात पकडली ३० लाखांची ६० किलो बेहिशोबी चांदी
Blockade: 60 kg of unaccounted silver worth Rs 30 lakh seized in Kopargaon
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 19April 2021, 11:30 :00
कोपरगाव :-कोरोना योद्ध्यांची भूमिका बजावता बजावता या संधीचा फायदा घेऊ पाहणार्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून पस्तीस लाखाच्या मुद्देमालासह ६० किलो बेहिशोबी चांदी पकडण्याची धडक कामगिरी करणाऱ्या कोपरगाव शहर पोलिसांच्या कारवाईचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहे. यामध्ये साई तपोभूमी चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. शनिवारी (ता.१७) रात्री ९ वाजेच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी ६० किलोची बेहिशोबी चांदी घेऊन जात असताना कोपरगाव शहर पोलिसांनी ती हस्तगत केली आहे.कोरोना काळातही कोपरगाव शहर पोलिसांनी एवढी मोठी कारवाई केल्याने पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केलेल्या आदेशानुसार कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलम १४४ नुसार कडक अंमलबजावणी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पोलिसांवर आहे. यानुसार शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.याच दरम्यान शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील राजगुरूनगर हुपरी येथील सौरभ अनिल पाटील (वय २६ ) हा व्यापारी सियाज कारमधून (क्र.एमएच.१८, एजे.९०२०) येवला-कोपरगाव मार्गे शिर्डीकडे जात होता.विशाल कोळपे आदिंनी गाडीची काच उघडी ठेवून आणि तोंडाला मास्क लावलेला नसल्याने दंडात्मक कारवाईसाठी गाडी थांबविली. मात्र, त्याने मी हार्डवेअर दुकानदार असून गाडीमध्ये काहीही नसल्याचे सांगितले. त्यावेळी साई कॉर्नर येथे नाकाबंदीसाठी तैनात असलेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, चालक तथा सहाय्यक फौजदार साठे, पोलीस शिपाई राम खारतोडे, नवाळी, गृहरक्षक दलाचे जवान अमोल थोरात,हे पथक होते आरोपीने गाडीत काही नसल्याचे सांगितल्याने, पोलीस निरीक्षक देसले यांचा संशय बळावल्याने त्यांनी गाडीची झडती घेण्यास सहकाऱ्यांना सांगितले. त्यावेळी झडती घेतली असता गाडीच्या पाठीमागील सिटला चैन दिसली. व तो भाग फुगीर दिसला अधिक तपासणी केली असता आत मध्ये एक चोर कप्पा बसलेला होता त्यात एका पांढ-या रंगाच्या गोणीमध्ये चांदीसदृश्य ठोकळे दिसले. याची खातरजमा करण्यासाठी विचारल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर कोणतेही खरेदीचे कागदपत्रे मिळून न आल्याने पोलिसांनी गुरनं.१२०/२०२१ मपोका.१२४, भादंवि.१८८ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ५ लाख रुपयांची कार आणि ३० लाख रुपये किंमतीची चांदी असा३५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षिका डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यासह पथकाने केली आहे; याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.