कोरोना मृत पावलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कार बंद करणे सह नगर परिषद कर्मचाऱ्यांचा १ मे पासून काम बंदचा इशारा
Corona warns city council staff to stop work from May 1, including closing funerals for dead patients
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 30April 2021, 13:30 :00
कोपरगाव: कोरोना विषाणूने बाधित होऊन नगरपालिका व नगर पंचायतमधील कर्मचारी मयत पावत आहेत. त्यांना कोणतीही सुविधा मिळत नाही, दोन महिन्यापासून वेतन मिळत नाही उपासमारीला कंटाळून व इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाचे दुर्लक्ष व डीएमए. कार्यालयाकडून होत असलेल्या विनाकारण त्रासामुळे मागण्या पूर्ण होत नसल्याने कोरोना मृत पावलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कार बंद करणे सह नगर परिषद कर्मचाऱ्यांचा १ मे पासून काम बंदचा इशारा देणारे निवेदन कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना आज नगरपालिका कर्मचारी संघटनांच्या वतीने देण्यात आले आहे.
कोरोना विषाणूने बाधित होऊन नगरपालिका व नगर पंचायतमधील कर्मचारी मयत पावत आहेत. त्यांना कोणतीही सुविधा मिळत नाही. एवढे असताना राज्य शासन नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. १ मे पर्यंत नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त कर्मचारी व नगरपालिका रोजंदारी कृती समितीच्या वतीने संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
नगर पालिका, नगर पंचायती मधील सफाई कामगार, पाणीपुरवठा मजूर व इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना दोन-दोन महिने वेतन वेळेवर मिळत नाही. त्यामु्ळे कोरोना काळात त्यांची उपासमार होत आहे. याचबरोबर इतर मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. कोरोना परिस्थितीत नगर परिषद, नगर पंचायतचे कर्मचारी फ्रंटलाईनवर काम करत आहेत. मागील आठ ते दहा दिवसांमध्ये विविध नगर पालिका, नगर पंचायती मधील पंधरा ते वीस कर्मचारी कोरोनाबाधित होऊन मयत पावलेले आहेत. या प्रकाराची शासनाने साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे मयत कुटुंबीयाचे संसार उघड्यावर आले आहे.
दिवसेंदिवस कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्यातील इतर आस्थापनामध्ये १५ टक्के उपस्थिती ठेवण्याची सूचना शासनाच्या वतीने देण्यात आली आहे. परंतु, अत्यावश्यक सेवा असे कारण सांगत नगरपरिषद, नगरपंचायतीची उपस्थिती शंभर टक्के ठेवून कोणतेही विमा संरक्षण न देता कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण व त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार समोर येत आहे. ३० एप्रिलपूर्वी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शासनस्तरावर निर्णय झाला नाही तर राज्यातील नगर परिषद, नगर पंचायतमधील सर्व कर्मचारी १ मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे, उपाध्यक्ष धर्माजी खिल्लारे, रामेश्वर वाघमारे, दीपक रोडे, जयसिंग कचवाहा, अनुप खरारे, पी. बी. भातकुले, धनराज पिलवाह, प्रशांत नकवाल, संजय कुंभार, रत्नाकर अडशिरे, व्ही. टी.लहाने, गिरीष डुबेवार, सुभाष मोरे, हरिदास सोनुने, देवराम मुके, निलेश सपकाळ, किशोर भावसार, किरण अहेर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. येथील नगर पालिका कर्मचाऱ्यांनी आज शुक्रवारी (३०) रोजी सकाळी उपमुख्याधिकारी सुनील गोरडे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना सदर काम बंद आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन दिले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे, राज्य नगर विकास मंत्री नामदार प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव महेश पाठक, डॉक्टर किरण कुलकर्णी आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय, मुंबई यांना पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.