कोरोना योध्यांना माजी सैनिकांची साथ – आ. आशुतोष काळे कोपरगाव : शिथिल संचारबंदी, मुक्त आवागमन,पाहुण्यांची वाढलेली वर्दळ यामुळे कोपरगाव तालुक्यात चार कोरोना बाधित सापडले, पण तरीही संपर्कात आलेल्या कोणालाही लागण झाली नाही. कारण या कोरोना शून्य विजयात कोरोना योध्यांना माजी सैनिकांची साथ लाभली असल्याचे गौरवोद्गार आमदार आशुतोष काळे यांनी माजी सैनिकांच्या कार्याचा सत्कार प्रसंगी व्यक्त केले आ. काळे म्हणाले, कोरोना संकटात आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत होते. कमी कुमक असल्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला होता. अशावेळी माजी सैनिक पोलिसांच्या मदतीला धावून आल्याने कोरोनाला रोखण्यात यश आले संसर्ग वाढू दिला नाही. सीमेवर लढणारे सैनिक असो किंवा कोरोनात साथ देणारे माजी सैनिक असो त्यांचे आपल्यावर असंख्य ऋण आहेत. या ऋणाची जाणीव समाजाला व्हावी या हेतूने आज माजी सैनिकांच्या कोरोनातील योगदानाचा सन्मान सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येत असल्याचे आ. काळे शेवटी म्हणाले, यावेळी माजी सैनिक असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल होन, उपाध्यक्ष राघवेंद्र वाडेकर, संघटक युवराज गांगवे व सर्व सदस्य उपस्थित होते. फोटो ओळी- माजी सैनिकांचा गौरव करतांना आमदार आशुतोष काळे.