खोटे आरोप करून तुमचे अपयश झाकले जाणार नाही – सुधाकर रोहोम
Your failure will not be covered by false accusations – Sudhakar Rohom
पुन्हा निळवंडेची पिपाणी वाजवून नागरिकांची फसवणूक करू नका
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Wed 21July 17:45
कोपरगाव :सत्ताधारी आमदार असतांना त्या सत्तेचा उपयोग मतदार संघाच्या विकासासाठी कसा करायचा हे आमदार आशुतोष काळे यांनी दाखवून देतांना शहरातील पाच नंबर साठवण तलाव, गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न, उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न दीडच वर्षात मार्गी लावून दाखविला ते देखील कोरोनाचे संकट असतांना. मात्र याउलट मागील पाच वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकहाती सत्ता असतांना पाच वर्षात फक्त मंत्र्यासमवेत फोटो काढून तुम्ही जनतेची दिशाभूल केल्यामुळे आज कोपरगाव शहरातील नागरिकांवर हि वेळ आली आहे. राज्यात व केंद्रात तुमचीच सत्ता असतांना तुम्ही सपशेल अपयशी ठरल्या आहेत. हे तुमचे अपयश खोटे आरोप करून कदापि झाकले जाणार नाही अशी टीका कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम यांनी मा.आ.स्नेहलता कोल्हे यांच्यावर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
पत्रकात रोहोम यांनी म्हटले आहे की, मागील पाच वर्षात मतदार संघाचे मुलभूत प्रश्नांची जाण नसल्यामुळे मा.आ. कोल्हे यांना एकहाती सत्ता असतांनाही मतदार संघाचे प्रश्न सोडविता आले नाही. २०१६ च्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाने दिलेली हुलकावणी व त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पानिपत झाल्यामुळे त्यांनी मतदार संघाच्या विकासाचा विचारच डोक्यातून काढला होता. त्यामुळे मतदार संघातील शेतकऱ्यांना. बोंड अळीच्या नुकसान भरपाई पासून तसेच २०१५/१६ च्या रब्बी अनुदानापासून वंचित राहावे लागले होते. शिवाय २०१८ साली दुष्काळी परिस्थिती असतांना कोपरगाव तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला होता. त्यावेळी राज्यात व केंद्रात सत्ता असून देखील विद्यमान आ. कोल्हे मुग गिळून गप्प बसल्यामुळे आमदार आशुतोष काळेंना आमरण उपोषणाला बसावे लागले होते. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न पाच नंबर साठवण तलावाच्याच माध्यमातून सुटू शकतो यासाठी आ.आशुतोष काळे यांनी सात दिवस धरणे आंदोलन केले होते. त्यांना श्रेय मिळू नये यासाठी कोण आडवे आले मा.आ. कोल्हे यांना कोपरगाव शहराच्या विकासाशी देणं-घेणं नाही. कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाला कोल्हेच जबाबदार आहे त्याबाबत वास्तव परिस्थिती शहरवासीयांच्या समोर आली आहे. त्यांच्याच आदेशाने २८ विकासकामांना उच्च न्यायालयातून स्थगिती आणल्यामुळे कोपरगावच्या नागरिकांनी त्यावर शिक्कामोर्तब केले असून या पापाचे धनी कोल्हेच आहेत. त्यामुळे त्या बेछुट आरोप करीत आहेत. निळवंडेचे पाणी कोपरगावला येणे शक्यच नसतांना देखील शहरवासियांना खोटे स्वप्न दाखविले आणि आता पुन्हा निळवंडेची पिपाणी वाजवून पुन्हा एकदा जनतेची दिशाभूल करीत आहे. मतदार संघाची विकास कामे मार्गी लावली असती तर त्यावेळी आ.आशुतोष काळे यांना आमरण उपोषण, धरणे आंदोलन करायची वेळ का आली याचे आत्मपरीक्षण करा. मागील पाच वर्षात सत्ता नसतांना देखील विकासाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी ते लढाई लढत होते. मात्र आता आ.आशुतोष सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे विकास कसा करायचा याची चुणूक त्यांनी दीडच वर्षात मतदार संघातील जनतेला दाखवून दिले आहे. त्यामुळे तुम्ही आडवे पडा, नाही तर पडू नका मतदार संघाचा विकास थांबणार नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला तुमच्याच भाषेत योग्य उत्तर दिले जाईल असा ईशारा देखील रोहोम यांनी दिला आहे.
चौकट :- कोपरगाव शहराला कुठूनही पाणी आले तरी ते पाणी साठविण्यासाठी साठवण तलावांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी पाच नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणार आहे. मात्र त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून निळवंडेची पिपाणी वाजवीण्यात त्या दंग राहिल्या. कोपरगाव शहराला पाणी आणण्यासाठी त्यांना कोणी अडविले नाही. त्यांच्याकडे सत्ता असतांना देखील त्या पाणी आणु शकल्या नाही हे तर त्यांचे अपयश आहे. त्यांनी निळवंडेचे गाजर दाखविल्याचे कोपरगावच्या जनतेने ओळखले आहे. जनतेला मतदार संघाचा विकास हवा आहे त्यामुळे आरोप प्रत्यारोप करून जनतेची करमणूक करण्याचे थांबवा. – व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम





