महसूलबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यास कडक कारवाई – आ. आशुतोष काळे
Strict action in case of complaints from citizens regarding revenue – MLA. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Mon 26July 19:00
कोपरगाव : तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना चांगली वागणूक मिळत नाही व त्यांची कामे देखील वेळेवर होत नाही. नागरिकांना अनेक हेलपाटे मारावे लागतात अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. आजपर्यंत सौम्य भाषेत सांगितले यापुढे सुधारणा झाली नाही तर कडक कारवाई करणार असल्याची तंबी आमदार आशुतोष काळे यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली आहे.
आ. आशुतोष काळे यांनी सोमवारी (दि.२६) रोजी तहसील कार्यालयात महसूल विभागाची आढावा बैठक घेवून महसूलच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत चांगलीच कानउघाडनी केली.
यावेळी मागील महिन्यात दहेगाव बोलका येथे वीज पडून मयत झालेल्या राजू जाधव यांच्या वारसांना रु. ४ लाखांचा धनादेश व राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना व संजयगांधी योजना लाभार्थी मंजुरी आदेश वाटप व रेशनकार्ड आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, सदस्य श्रावण आसने, कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, जिनिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, सुधाकर होन, गणेश घाटे, मच्छिन्द्र जामदार, अशोक नेहे, नानासाहेब नेहे, नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी, माधवी गोरे, पुरवठा अधिकारी सचिन बिनोड, राजेंद्र चौरे, मंडलाधिकारी बी.के. जेडगुले, शकुंतला गोंदके, जयवंत भांगरे व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आ. आशुतोष काळे यांनी महसूलच्या विविध विभागांचा आढावा घेतला. रेशनकार्ड ऑनलाईन होत नाही याबाबत सातत्याने नागरिकांच्या तक्रारी येत आहे. रेशनवरील धान्य दरमहा लवकरात लवकर वितरीत होईल याची काळजी घ्या. अनेक रेशन दुकानदार लाभधारक नागरिकांना व्यवस्थित वाटप करत नसल्याच्या तक्रारी आहे अशा तक्रारी यापुढे येवू देवू नका व रेशनचा काळा बाजार होता कामा नये असे आढळून आल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्व स्मशान भूमी व कब्रस्थान जागा मागणी प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावून नागरिकांच्या जमिनीचे विषय देखील तातडीने मार्गी लावा. सजेवर थांबत जा व फोन उचलत जा आणि गोरगरिब नागरिकांचे काम गावातल्या गावात वेळेत करा व नागरिकांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी महसूल प्रशासनाला दिल्या.