विवेक कोल्हे यांनी अगोदर कार्यकर्त्यांना सुसंस्कृतपणाचे धडे द्यावेत – नवाज कुरेशी
Vivek Kolhe should first teach the culture to the workers – Nawaz Qureshi
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Sat 7 August 19:40
कोपरगाव: हॉटेलवर जाऊन राडा करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना अगोदर संस्कृतीचे धडे द्यावेत,अशा शब्दांत रायुकॉचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी विवेक कोल्हे यांना टोला लगावला आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या चौकात येवून ठोकून काढू या वक्तव्याचा समाचार घेताना सुसंस्कृत नेत्याच्या वारसाची भाषा नाही असे वक्तव्य विवेक कोल्हे यांनी केले होते. त्यावर रायुकॉचे नवाज कुरेशी यांनीही कोल्हेंच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
आ. आशुतोष काळे हे प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला जर कुणी दमबाजी करीत असेल तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे स्वाभाविक आहे. म्हतारी मेल्याचं दु:ख नाही, मात्र काळ सोकावू नये हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र त्याचा कुणी गैरअर्थ काढून उपदेशाचे धडे देणे निश्चितपणे चुकीचे आहे. एक दिवस अगोदरच गटारी साजरी करण्यासाठी गेलेल्या कोल्हेंच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा घातला. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नवाज कुरेशी यांनी जोरदार टिका केली. माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्याकडून संस्कृतीचे धडे घ्या व कार्यकर्त्यांनाही संस्कृती शिकवा, आ. आशुतोष काळे कोरोनाच्या संकटात कोट्यावधी रुपयांचा निधी आणत असतांना आपण त्यांच्या नावाने उगाचच खडे फोडत आहात असा आरोप शेवटी केला .