भि.ग. रोहमारे ट्रस्टच्या ३३ व्या ग्रामीण पुरस्काराची घोषणा
Bhi.G. Announcement of 33rd Rural Award of Rohmare Trust
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue30 Nov.2021 16.20Pm.
कोपरगाव : येथील भि.ग. रोहमारे ट्रस्ट वतीने १९८९ पासून देण्यात येणाऱ्या ३३ व्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कार संदीप जगताप (सांगोला, जि. सोलापूर), माधव जाधव (नांदेड), जयराम खेडेकर (जालना), केदार काळवणे (कळंब, जि. उस्मानाबाद), अनंता सूर (वणी, जि. यवतमाळ), इ. लेखकांना देण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी येथे दिली. ग्रामीण नवलेखकांच्या निर्मितीक्षम मनांना प्रोत्साहन देणे, हा यामागील मूळ उदेश असल्याचे त्यांनी सांगितले. आजपर्यंत या पुरस्काराने एकशे साठ पेक्षा जास्त लेखकांना सन्मानीत करण्यात आले आहे.
वीजेने चोरलेले दिवस संतोष जगताप (ग्रामीण कांदबरी दर्या प्रकाशन, पुणे), चिन्हांकित यादीतली: माणसं माधव जाधव (ग्रामीण कथासंग्रह-सायन पब्लिकेशन, पुणे), मोरपीस: प्रा. जयराम खेडेकर (ग्रा. कविता संग्रह-उमी प्रकाशन, जालना), ग्रामीण साहित्य: संकल्पना आणि समीक्षा: केदार काळवणे (ग्रा. साहित्य समीक्षा अक्षरबाङ्मय प्रकाशन, पुणे), काटेरी पायवाट: अनंता सूर (ग्रा. आत्मकथन अर्थव पब्लिकेशन, धुळे) प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना प्रत्येकी रोख ११,०००/ स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ट्रस्टकडे आलेल्या एकूण ५२ साहित्यकृतीपैकी उपरोक्त ग्रंथांची निवड करण्यात आली. या प्रसंगी ट्रस्टी रमेशराव रोहमारे, सौ. शोभाताई रोहमारे, संदीप रोहमारे, अँड राहुल रोहमारे व प्राचार्य डॉ. बी. एस. यादव उपस्थित होते. या वर्षी समीक्षा या साहित्य प्रकारात समाधानकारक ग्रंथ न आल्याने या प्रकाराचा पुरस्कार ग्रामीण साहित्य: संकल्पना आणि समीक्षा व काटेरी पायवाट या ग्रंथांना विभागून देण्यात आला आहे. निवड कामी डॉ. भीमराव वाकचौरे, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, डॉ. गणेश देशमुख, डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. संजय दवंगे यांच्या संयुक्त निवड समितीने केले. वरील ग्रंथाशिवाय निवड समितीने उन्हानं बांधलं सावलीचं घर (भाग्यश्री केसकर), फरफट (छाया बेले). मातीमळण (विजयकुमार मिठे), सृजनगंध (डॉ. चंद्रकांत पोतदार), ऋतु बरवा (विश्वास बसेंकर) या ग्रंथांचा उल्लेखनीय ग्रंथ म्हणून निवड समितीने विशेष निर्देश केला आहे. कै.के.बी. रोहमारे यांच्या तेवीसाव्या स्मृतिदिनी ज्येष्ठ मराठी व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक व चित्रपट पटकथाकार डॉ. सदानंद देशमुख यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कोपरगावचे माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ( ७ डिसेंबर ) रोजी सकाळी १० वा. सोमय्या कॉलेज येथे देण्यात येणार आहे. तरी आपण उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव ॲड. संजीव कुलकर्णी व प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी केले आहे .