कोपरगाव शहराचे पिण्याच्या पाण्याचे वाढीव आरक्षण शेतकऱ्यांच्या मुळावर – थोरात
Increased reservation of drinking water of Kopargaon city at the root of farmers – Thorat
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 22 Dec.2021 20.10Pm.
कोपरगांव : दारणा धरणांवर वाढते बिगर सिंचन पाण्यांचे आरक्षणामुळे गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांची शेती दिवसेंदिवस उध्वस्त होत चालली आहे परिणामी शेतकरी देशोधडीला लागला आहे त्यातच सन २००५ मध्ये समन्यायी पाणीवाटप कायदा आल्याने गोदावरी लाभधारक शेतक-यांचे २०१२ सालापासुन अतोनात नुकसान होत आहे असे असतांना कोपरगांव शहराच्या पिण्यांच्या पाण्यांचे आरक्षण दारणा धरणांवर आणखी वाढविण्यांत आल्याने गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांच्या ते मुळावर आले आहे अशा आशयाचे पत्रक लाभधारक शेतकरी नारायण थोरात, किसन गाजरे, कैलास येवले यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
ते पुढे म्हणाले की, दारणा धरणांवर अगोदरच बिगर सिंचन पाण्यांचे आरक्षण वाढले आहे त्यातच कोपरगांव शहरासाठी निळवंडे शिर्डी कोपरगांव या बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाण्यांचे आरक्षण मंजुर असतांना पुन्हा नव्याने कोपरगांव शहरासाठी ३.३३ दलघमी पाणी आरक्षण दारणा धरणावर टाकण्यात आले आहे. दारणा धरणावर आतापर्यंत ७८ ते ८० टक्के बिगरसिंचन पाण्यांचे आरक्षण वाढलेले आहे. कोपरगांव शहरवासियांसाठी पुर्वी पिण्यांसाठी दारणा धरणात धरणातून ५.९८ दलघमी आरक्षण मंजुर होते आता ते ३.३२ दलघमीने वाढविण्यांत येवुन ९.२८ दलघमी साठवण तलावाच्या मुखाशी मंजुर करण्यांत आले आहे.
गोदावरी डाव्या कालव्यातुन कोपरगांव नगरपालिका साठवण तलावाच्या मुखाशी पाणी सोडण्याकामी सुमारे ६५ टक्के पाण्यांचा व्यय-लॉसेस होतात. निळवंडे शिर्डी कोपरगांव ही बंदिस्त पाईपलाईन कार्यान्वीत झाल्यास कोपरगांव नगरपालिकेला मंजुर असलेले ९.२८ दलघमी पाणी शेती सिंचनासाठी उपलब्ध होवु शकते. दारणा धरणांतुन एव्हढेच पाणी कोपरगांवसाठी सोडावयाचे झाल्यास ते पाच पट जादा ४५ दलघमी सोडावे लागते म्हणजेच याचा अर्थ चार पट पाण्यांचा ६५ टक्के व्यय होतो. निळवंडे शिर्डी कोपरगांव अशी बंदिस्त पाईपलाईन योजना कार्यान्वीत झाल्यास हे १ टीएमसी पाणी शेती सिंचनासाठी उपलब्ध होवु शकते व त्यातुन उन्हाळयातही शेती सिंचनासाठी पाण्यांचे आर्वतन उपलब्ध होवु शकते. तेंव्हा कोपरगांवचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या हितासाठी आणि मतदार संघातील शेतक-यांच्या शेतीसाठी निळवंडे शिर्डी कोपरगांव बंदिस्त पाईपलाईन तातडीने कार्यान्वीत करावी व गोदावरी कालव्यासाठी दारणेतील पाणी शेतीसाठी अबाधीत ठेवावे अन्यथा आम्हांस वेगळा मार्ग अवलंबवावा लागेल असा इशारा नारायण थोरात, किसन गाजरे, कैलास येवले या शेतक-यांनी दिला आहे.





