आता हवे दीर्घकाल टिकणारे सिमेंट रस्ते
सावधान : दोनच दिवसापूर्वी आ. काळे यांनी केले होते याबाबतचे सूचक वक्तव्य ,
वृत्तवेध ऑनलाईन 13 July 2020
कोपरगाव : रस्त्याची पै आणि पै रस्त्यासाठीच खर्च झाली पाहिजे, केवळ एक – दोन जणांचे उखळ पांढरे करण्यासाठी हजारो कोपरगावकरांच्या जीवाशी कोणाला खेळता येणार नाही, आता हवे दीर्घकाल टिकणारे सिमेंट रस्ते ! या संदर्भात दोनच दिवसापूर्वी आ. आशुतोष काळे यांनी केले होते कान टोचणारे सूचक वक्तव्य ,
सिमेंट रोडच्या उंचीमुळे दुकानांमध्ये तसेच वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचण्याची शक्यता विचारात घेता पुढील काम करताना आधी एक फूट रस्ता खोदा व नंतर त्यावर सिमेंट रोडचे बांधकाम करा, अशी सूचना नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना केल्या पाहिजेत.
मुख्याधिकारी भूमिका
तसेच तयार केलेले रस्ते दीर्घकाळ टिकावेत आणि नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते मिळावेत यासाठी नळजोडण्या, मलनिःसारण, गटार, पाणी पुरवठा, विद्युत, दूरसंचार विभाग, महावितरण या विभागांना सेवा वाहिन्यांसाठी आधीच परवानगी घेण्याबाबत पालिका मुख्याधिकारी सरोदे यांनी कळवून नंतर कोणत्याही परिस्थितीत परवानगी देण्यात येणार नाही अशा सूचनाही संबंधित अधिकारी व नागरिकांना दिल्या पाहिजेत त्यामुळे भविष्यात रस्ते खोदण्यात येणार नाहीत. अशाच फक्त सूचना दिल्या पाहिजेत.
रस्ते आणि कोपरगावकर यांचे नाते
वर्षानुवर्षे कोपरगावच्या नागरिकांना खड्ड्याच्या रस्त्यावरून जावे लागते त्रास सहन करावा लागतो. वारंवार तक्रारी केल्यानंतर हे रस्ते करण्याची दखल पालिका घेते सर्व सोपस्कार पार पाडून ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली जाते मात्र वर्क ऑर्डर घेऊन ठेकेदार सात-आठ महिने काम करीत नाहीत. काम का चालू केले नाही ?, याबाबत नगराध्यक्ष नगरसेवक अधिकारी कोणीही जाब विचारत नाही. मग ठेकेदार एकतर पावसाळ्याच्या किंवा मार्च महिन्याच्या तोंडावर कामे घाईघाईने कामे उरकून टाकतात. परंतु एका पावसात या रस्त्याचे तीन-तेरा वाजले जातात. मात्र अर्थकारणात हात ओले झाल्यामुळे अधिकारी असो की, सत्ताधारी याबाबत कोणीही ठेकेदाराला जाब विचारताना दिसत नाही. पर्यायाने वर्षानुवर्षे खड्ड्यातून जाणाऱ्या नागरिकांना नवीन रस्ता होऊनही अवघ्या महिनाभरात त्या रस्त्यांची दुरावस्था होते.पुन्हा कोपरगावकरांच्या पाचवीला खड्डेच ! अनेक अपघात झाले, अनेकांना अधुपण मागे लागले, मनक्याचे आजार सुरू झाले, परंतु आजपर्यंत एकाही ठेकेदाराला काळया यादीत टाकल्याचे ऐकवीत नाही.
जनतेप्रती दायित्व
जनतेचा घामाचा पैसा मनमानीपणे खर्च होवून वाया जात असेल तर मग याला कुठेतरी व कोणीतरी पायबंद घातला पाहिजे. पैसा खर्च करणे आवश्यक आहे. ते झालेच पाहिजे. पण आता हवे दीर्घकाल टिकणारे सिमेंट रस्ते ! दोनच दिवसांपूर्वी आमदार आशुतोष काळे यांचा रोखही याकडेच होता.