कोपरगांव तालुक्यात धुक्क्याने पिकांचे नुकसान 

कोपरगांव तालुक्यात धुक्क्याने पिकांचे नुकसान

Crop damage due to fog in Kopargaon taluka

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 17Jan.2022 15.00Pm. 

कोपरगांव:   गेल्या आठ दिवसापासून हवेत प्रचंड गारठा निर्माण झाला असुन सोमवारी सकाळी साडेसहा ते नउ वाजेपर्यंत कोपरगाव शहरासह तालुक्याचा संपूर्ण परिसर धुक्याने वेढला गेला होता, वाहनचालकांना पाच मिनीटाच्या अंतरावरील कुठलेही वाहने दिसत नव्हती त्यामुळे त्यांना अत्यंत धिम्या गतीने वाहने चालवावी लागत होती.

चालु रब्बी हंगामात कोपरगांव तालुक्यात मोठया प्रमाणांत कांदा पिकाबरोबरच गहु, हरभरा, भाजीपाला, फळे, उस आदि पिकांची लागवड केली आहे. या धुक्यामुळे बुरशी, तांबेरा, करपा, भुरी, टिक्का, मावा, तुडतुडे रोगाची भिती वाढली आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त आहे. धुक्यामुळे औद्योगिक उत्पादन कारखानदार कामगार कामावर उशीरा आले. शालेय विद्यार्थ्यांना कसरत करावी लागली. शहरालगत नगर मनमाड महामार्ग तसेच नागपुर मुंबई द्रुतगती मार्गावर व शिर्डीकडुन ये जा करणारी वाहने अत्यंत संथगतीने चालु होती. ग्रामिण भागात मस्तपैकी शेकोटया पेटल्या होत्या.

थंडीसाठी चहा, कॉफी, दुधाचा स्वाद आर्वजून घेतला जात होता, आबालवृद्ध गरमाईचे ब्लँकेट ओढुन होते, तर चिमणी पाखरं, छोटी कुत्र्यांची पिल्ले दुपारी वाजेपर्यंत रस्त्यावर फिरकली नाहीत. सुर्यदर्शन झाल्यावर धुक्याचे प्रमाण कमी झाले. धुकाच्या चादरीत उसतोडणी कामगार व त्यांचे कोयते मात्र सुरूच होते. लहान मुला मुलींचे हाल झाले.   १०० वर्षांच्या इतिहासात जगात २०२१ हे वर्ष सर्वाधीक उष्ण म्हणुन नोंदले गेले. त्यामुळे कुठे मोसमी, बिगरमोसमी, गारपीट, वादळी पाउस होवुन पर्यावरणीय संतुलन बिघडले आहे. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढु लागली आहे. त्यातच कोरोनाची महामारी पिच्छा सोडायला तयार नाही. सर्वसामान्यासह मध्यमवर्गीयांचे आर्थीक अंदाजपत्रक कोलमडुन पडले आहे. लॉकडाउनमुळे हाताला काम नाही. शेतीवर येणारी संकटे काही थांबायला तयार नाहीत. हे धुके जैविक बुरशीसाठी प्रतिकुल आहे. बुरशीजन्य बरोबरच अन्य आजार वाढण्याचा मोठा धोका आहे त्यासाठी एम ४५ किवा सिक्सर, साफ, स्कोर त्याचप्रमाणे मेटारायझम किंवा बिवेरीया जैविक बुरशीनाशके एका एकरासाठी पीक परिस्थिती पाहुन २०० ते २५० मिली घेवुन पाण्यात सायंकाळी ४ ते ६ दरम्यान फवारणी करावी. ही फवारणी केल्यानंतर ८ ते १५ दिवसाच्या अंतराने रासायनिक किटकनाशके वापरावी असा सल्ला जळगाव तेलबिया संशोधन केंद्राचे कृषीतज्ञ पोपटराव खंडागळे यांनी दिला आहे.  फोटोओळी-कोपरगांव  सोमवारी सकाळी कोपरगांव शहर व तालुक्याचा संपूर्ण परिसर धुक्याने वेढला.

Leave a Reply

You cannot copy content of this page