शंकरराव कोल्हेंच्या निधनाने जनसामान्यांच्या प्रश्नांशी नाळ जुळलेले नेतृत्व हरपले- अजित पवार
With the demise of Shankarrao Kolhe, the leadership lost its connection with the issues of the masses – Ajit Pawar
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Wed 6 Mar 2022,19 :40Pm.
कोपरगांव : माजीमंत्री शंकरराव कोल्हे हे शिस्तप्रिय आणि वेळेचे बंधन पाळणारे राजकीय व्यक्तीमत्व होते, ९३ व्या वर्षापर्यंत त्यांनी जनसामान्यांच्या ध्यासाची उर्जा घेत विकासासाठी तळमळींने कार्य केले, त्यांच्या निधनाने जनसामान्यांच्या प्रश्नांशी नाळ जुळलेले नेतृत्व हरपले अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी श्रध्दांजली वाहिली.
संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनानंतर कोल्हे कुटूंबियांचे सांत्वन करण्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी येसगांव कोल्हे वस्ती निवासस्थानी आले त्याप्रसंगी ते बोलत होते. समवेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामिण विकास मंत्री हसन मुश्रीफ, आ.आशुतोष काळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार आशुतोष काळे, सिंधुताई कोल्हे, संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयूटचे कार्यकारी विश्वस्थ अमित कोल्हे, सुमित कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, सुरेशअंकल कोल्हे, जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार आदि उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी स्वतःबरोबर समाजाला घडविले. त्यांच्या बरोबर विधीमंडळात काम करतांना शिस्त काय असते आणि ती कशी सांभाळायची याची शिकवण मिळाली. त्यांचा फ्रान्समधील घडयाळाचा कारखाना यशस्वी झाला असता तर ते नामांकित उद्योगपतींच्या वरच्या श्रेणीत असते. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्राशी प्रामाणिक राहुन त्यांनी तळागाळातील उपेक्षीतांचे प्रश्न सोडविण्यांवर विशेष भर दिला. शेती आणि शेतकरी, पाणी हे त्यांचे जिव्हाळयाचे विषय होते. समस्यांच्या मुळाशी जाउन त्याची सोडवणुक करणारे नेतृत्व म्हणजे शंकरराव कोल्हे होते. देश व राज्यपातळीवरील साखर उद्योग आणि त्याच्या समस्यांचे निराकरणाबाबत त्यांचा दांडगा अभ्यास होता. संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमांतुन परिसराच्या प्रगतीत त्यांचे विशेष योगदान होते. त्यांच्या जाण्याने शिस्तप्रिय राजकारणी हरपला असेही ते शेवटी म्हणाले.