कोपरगाव : महाविकास आघाडी शासनाविरोधात ‘जनआक्रोश मोर्चा’
Kopargaon: ‘Janaakrosh Morcha’ against Maha Vikas Aghadi government
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on:Mon 2 May 2022, 17.20
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव :आघाडी सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय, शेतक-यांना पुर्ण दाबाने वीज मिळालीच पाहिजे, नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी, कोपरगांव तालुक्याला अंधाराच्या खाईत लोटणा-यांचा धिक्कार असो, कंदीले घेवुन मोट धरू, सांगा महाविकास आघाडी सरकार आम्ही अंधारात पेरू का, कोण म्हणतो देणार नाही घेतल्या शिवाय सोडणार नाही, अशा घोषणा देत राज्यातील
महाविकास आघाडी शासनाविरोधात
जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली व तत्कालीन आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळी ११ वाजता भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहर व तालुक्यातुन नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
अनेकांच्या हातात शासनाचा धिक्कार असो, असे फलक होते. मोर्चात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. मेनरोड, अहिंसा चौक, गुरुद्वारा रोडने तहसील कार्यालयावर गेला. येथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
या सभेत विवेक कोल्हे यांनी महा विकास आघाडी सरकार व लोकप्रतिनिधीच्या निष्क्रिय कार्यपद्धतीवर चौफेर हल्ला करतांना ते म्हणाले, येथील प्रशासन कुणाच्या तरी दडपणाखाली काम करताना दिसत आहे. पण आम्ही कोल्हेंच्या संघर्ष मुशीतुन घडलेलो फायटर आहोत, प्रश्न सुटल्याशिवाय गप्प बसणार नाही. नेमका आमच्याच जनआक्रोश आंदोलनाला अहमदनगर जिल्हयातच प्रतिबंधात्मक आदेश का लावला गेला, गेल्या अडीच वर्षापासुन या मतदार संघातील वंचित शेतकरी जनसामान्य अभासी चित्रातुन बाहेर येवुन स्वयंस्फुर्तीने रस्त्यावर उतरून आम्हाला साथ देत आहे. एका कार्यक्रमात नक्कल करताना लोकप्रतिनिधी म्हणाले आगे आगे देखो होता है क्या, झाले तर काहीच नाही, केले काय तर म्हणे तात्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या विकासकामांची मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून घेतली. निळवंडे शिर्डी कोपरगांव पाणी योजनेला खोडा घालुन आमदारांनी गोदावरी कालव्यांचे एक जादा पाण्यांचे आवर्तनाचे वाटोळे केले त्याचा आम्ही निषेध करतो,
यावेळी विवेक कोल्हे यांनी गोदावरी कालव्याबरोबरच निळवंडे धरण कालव्यांची कामे मार्गी लागावी, कोपरगाव शहरासाठी निळवंडे शिर्डी कोपरगांव पाणी योजना मार्गी लागावी, विस्थापितांचे पुर्नवसन व्हावे, एम आय डी सी साठी जागा द्या,रेशनकार्ड, घरकुल, संजयगांधी निराधार, श्रावण बाळ वृध्दापकाळ या शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित ठेवू नका. या मागण्या व प्रश्न बऱ्या बोलाने सोडवा नाही तर आम्हीच सोडवू यासाठी मग हजारोच्या संख्येने आझाद मैदानावर धडकू, एम आय डी सी ची मागणीत कोणी खोडा घालु नये असा गर्भित इशारा त्यांनी यावेळी दिला.
कोपरगांव मतदार संघातील शेतकरी व नागरिकांचे जिणे मुश्कील झाले असताना तिकडे हजारो कोटी निधी आणल्या च्या बातम्यांचा मात्र सुकाळ असल्याची खिल्ली उडवून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लोकांचा आवाज दाबून या मतदार संघाबाबत वेगळे चित्र रंगवत आहे,असल्याची टीका केली. आमची लढाई ही आमदाराविरूध्द नाही तर प्रवृत्तीविरूध्द आहे. असा टोला विवेक कोल्हे यांनी शेवटी लगावला .
सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, गोदावरी कालव्यावर बिगर सिंचन पाण्यांचा भार वाढतो आहे. कोपरगाव शहरवासीयांच्या तोंडापर्यंत विनासायास आलेले निळवंडे चे पाणी बुध्दीभेद करून थांबवून तहानलेल्या शहरवासीयांचा घसा कोरडा ठेवला, तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी गोदावरीचे एक आवर्तन वाढलं असतं ते ही घालविले आणि शहरवासीय व शेतकरी दोघांचाही घात केला. शासनाची तिजोरी पैशाने फुल भरलेली आहे. तर मग शेतकरी उपाशी कसा? नागरिकांच्या छोट्या-छोट्या समस्या का सुटत नाहीत? काकडी ग्रामपंचायतीचे साडेपाच कोटी रुपये द्यायला शासनाकडे पैसे का नाहीत? मात्र एकट्या कोपरगाव मतदार संघासाठी अर्थमंत्री एक हजार कोटी निधी देण्याच्या घोषणा करतात. हा फसवा फसवीचा खेळ सुरू आहे. आपल्या कार्यकाळांत बसस्थानक, पोलिस ठाणे, अग्निशमन केंद्र, पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका इमारत, वाचनालय, गोकुळनगरीचा पुल इत्यादी विकास कामे पूर्ण झाली त्याचीच तर उदघाटने यांनी मंत्र्यांना आणून केली, नवे काय? अशा प्रश्नांची सरबत्ती करून हे तीन नापास विद्यार्थी राज्याच्या सत्तेत बसले आहेत अशी टीका केली. शेतकरी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यावर बोलायला या सरकारमधील मंत्री महोदयांना वेळ नाही, गृहमंत्री जेल मध्ये आहे आणखी काही त्या रांगेत आहेत. आज राजकारणांत नैतिकतेचे अध:पतन चालु आहे. अशी खंत त्यांनी शेवटी व्यक्त केली.
याप्रसंगी बाळासाहेब वक्ते, जितेंद्र रणशुर, एल. डी. पानगव्हाणे, केशव भवर, विक्रम पाचोरे, मच्छिंद्र टेके आदिंनी जनसामान्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा पाढा वाचला. प्रास्ताविक साहेबराव रोहोम यांनी केले.
सुत्रसंचलन दिपक चौधरी यांनी करून आभार मानले.
नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, वीज वितरण कंपनीचे श्री. खराटे आदिंना शेतकरी, जनसामान्य नागरिक, पालक, सुशिक्षीत बेरोजगार विस्थापीत टपरीधारक, निळवंडे लाभधारक शेतक-यांसह हजारोंच्या स्वाक्षरीचे निवेदने देण्यात आले. तर वीज वितरण कार्यालयाच्या अधिका-यांना वीजेच्या खेळखंडोब्याचा निषेध म्हणून कंदील भेट देण्यांत आला.
चौकट
स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत आमचा आवाज दाबण्याचा कुणी प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर देवु
तुम फायर हो तो हम फायटर है – विवेक कोल्हे .