अतिक्रमणधारकांना कोपरगाव नगरपालिकेकडून २० मेपर्यंत अल्टिमेटम
Kopargaon Municipality issues ultimatum to encroachers till May 20
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Thu 12 May 2022, 19.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : शहरातील मुख्य रस्त्यावरील तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे पुन्हा काढण्यात येणार असून त्यावर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी टाऊन प्लॅनिंग ऑफिसर व अतिक्रमण विभागाकडून संबंधितांना नोटीस दिल्या असून येत्या वीस तारखे पर्यंत त्यांनी आता आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत अशी अंतिम मुदत त्या नोटीस मध्ये देण्यात आली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर जवळपास अडीशे ते २६० अतिक्रमणे झालेली असून या सर्वांना नोटिसा देण्यात येणार असून, आत्तापर्यंत ४० जणांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी दिली.
सदरच्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १७९व १८० अन्वये ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील कलम १७९(१) अन्वये नगरपरिषद मुख्याधिकारी यांची लेखी परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक रस्त्यावर तसेच नाले व गटारी बाबत कोणतेही प्रक्षेपित होणारी संरचना किवा वास्तू बांधता कामा नये किंवा मांडता कामा नये. तसेच कोणतेही व्यापारी जिन्नस व इतर कोणतीही वस्तू ठेवता कामा नये, अशी तरतूद आहे. आरोग्य दि. ९/०४ २०२२ रोजीच्या प्राप्त अहवालानुसार कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक वापराच्या मालकीच्या प्रकारचे अतिक्रमण करून आपण उक्त अधिनियमातील तरतुदीचे या बाबत उल्लंघन केलेले आहे. आपण केलेल्या अतिक्रमणामुळे नगरपरिषदेस सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व इतर सार्वजनिक सेवा सुविधा नागरिकांना देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. याबाबत सदरची कायदेशीर तरतूद आपणास माहित असूनही आपण जाणीवपूर्वक या कडे दुर्लक्ष करून नमूद केलेप्रमाणे अतिक्रमण केलेले असून सदरची कृती ही बेकायदेशीर आहे. त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १७९ (३) मधील तरतुदीनुसार मुख्याधिकारी यांना कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावर किवा रस्त्यावरील कोणतीही नाली किंवा गटारे, मल:प्रणाल किंवा सेतुप्रणाल यांवर केलेली कोणतीही संरचना किंवा वास्तू किंवा कोणतेही प्रक्षेपण, अतिक्रमण किंवा अडथळा नोटीस न देता काढून टाकण्याचा अधिकार आहे.
आपण उक्त परिच्छेदात नमूद केलेप्रमाणे सार्वजनिक वापराच्या जागेवरील अतिक्रमण काढून घेण्यासाठी सदर नोटीशीच्या दिनांकापासून तीन दिवसांची मुदत देण्यात येत आहे. सदर अतिक्रमण आपण मुदतीत काढले नाही तर आपणाविरुद्ध कायदेशीर कारवाई करणेत येईल तसेच सदरचे अतिक्रमण नगरपरिषदेमार्फत निर्मूलन करण्यात येईल. या कारवाई दरम्यान होणाऱ्या कोणत्याही स्वरूपाच्या नुकसानीची भरपाई करणेची जबाबदारी आपली राहील. असे त्यात नमूद केले आहे. त्याची प्रत पोलिस ठाण्याला पाठवण्यात आली आहे असे श्री चाकणे यांनी सांगितले.
शहरातील अतिक्रमणे २३ व २४ मार्च रोजी काढण्यात आली होती. त्यानंतर युवक नेते विवेक कोल्हे यांनी विस्थापित अतिक्रमण धारकांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला होता व मुख्याधिकारी दालनात जाऊन ही मोहीम थांबली होती, मात्र आता पुन्हा या मोहिमेने उचल खाल्ली असून अतिक्रमणधारकामध्ये आता पुन्हा घबराट पसरली आहे.
त्यात कोपरगाव नगरपरिषद तर्फे कोपरगाव शहर बस डेपो समोरील व परिसरातील तसेच कोपरगाव शहरातील मुख्य रस्ता, पालखी रस्ता, धारणगांव रस्ता, साईबाबा कॉर्नर परिसर, काँग्रेस कमिटी समोरील रस्ता, बिरोबा मंदीर परिसर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळ्यामागील येवला रोड, खुले नाट्यगृह समोरील रस्ता व शहरातील इतर ठिकाणावरील अतिक्रमण काढल्याचा समावेश आहे.
अतिक्रमण काढतांना सदर जागेमधील टपरी, हातगाडी, साहित्य इ. काढण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आलेला होता. तसेच साहित्य अतिक्रमण धारकांना परत नेण्याची मुभा देण्यात आली होती. सदर ठिकाणचे अतिक्रमण काढतांना कोपरगाव नगरपरिषदेची सर्व यंत्रणा, जे.सी.बी., ट्रॅक्टर, रिक्षा, टेम्पो तसेच अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगार मुकादम यांचे पोलीस निरीक्षक यांचेकडील पोलीस बंदोबस्त व यंत्रणा यांनी आपआपले कर्तव्य पार पाडले आहे. परंतु सद्यस्थितीत काही ठिकाणी काढण्यात आलेल्या अतिक्रमणीत जागेवर पुनश्चः अतिक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे.
सदरची अतिक्रमणे ही वाहतुकीस अडथळा ठरणारी आहेत. त्यामुळे याद्वारे तमाम अतिक्रमण धारकांना सुचित करण्यात येते की, सदर जागेवर पुन्हा कुठल्याही स्वरुपाचे अतिक्रमण करण्यात येवू नये अन्यथा अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई करतांना सदर अतिक्रमण धारकांचे साहित्य जप्त करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १७९ अन्वये कारवाई करण्यात येईल. तसेच अतिक्रमण करणारी व्यक्ती कायदेशीर कारवाईस पात्र राहील व होणाऱ्या | नुकसानीस स्वतः जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
मुख्याधिकारी यांच्या नावाने शहरात विविध ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.