शिवसेनेचे दोन नगरसेवक अपात्र शिवसेनेत संतप्त प्रतिक्रिया
Two Shiv Sena corporators disqualified Shiv Sena angry reaction
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Sat 14 May 2022, 15.20
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : महाविकास आघाडीचे सरकार असल्याची बतावणी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे वारंवार करतात परंतु प्रत्यक्षात मात्र शिवसेनेचे पदाधिकारी निवडणुकीसाठी अपात्र कसे ठरतील यासाठी मनसेच्या कार्यकर्त्याला वकील देऊन आर्थिक रसद पुरवायची हा कुठला आघाडी धर्म ? असा सवाल शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी आमचे प्रतिनिधी बोलताना केला.
शिवसेनेचे दोन नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख, माजी शहर प्रमुख, माजी उपशहर प्रमुख, युवा सेनेच्या पदाधिकारी यांचा समावेश होता. दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर आधीच उध्वस्त झालेली कोपरगावची बाजारपेठ रडतखडत उभी राहत असताना मंत्री येणाऱ्या सबबीखाली शहरांमध्ये अतिक्रमणाचा वरवंटा फिरवून दोन दिवसात शहर उद्ध्वस्त केले. अतिक्रमणाचा निषेध भाजपकडून करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याला मारले याचा कांगावा करत जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन शहर उद्ध्वस्त केले असल्याचे पत्रक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाने काढून शिवसेनेला बदनाम करण्याचे काम करण्यात आले हाच का आघाडी धर्म ? ,
त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई म्हणाले, पक्ष कोणताही असो कार्यकर्ते असो की शिवसैनिक संतप्त झाल्यानंतर अनेकदा सरकारी अधिकारी असो की कार्यालय तोडफोड केल्याच्या अनेक घटना घडलेले आहेत . अनेक ठिकाणी शिवसैनिकांवर ३५३ चे गुन्हे देखील झाले आहेत. त्याला तोंड देण्यास शिवसैनिक समर्थ आहेत.मात्र अधिकारी बदलून गेल्यानंतरही अधिकार्याची कड घेण्याच्या दिखाव्याच्या आड शिवसेनेचे पदाधिकारी निवडणुकीमध्ये कसे अपात्र ठरतील व आपल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा मार्ग कसा मोकळा होईल यासाठी मनसेच्या कार्यकर्त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करायला लावून वकील देऊन आर्थिक रसद पुरवून रडीचा डाव कोण खेळत आहे हे आता लपून राहिलेले नाही. एकिकडे आघाडी धर्म म्हणून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम राष्ट्रवादीकडून होत आहे. शिवसेनेच्या पदाधिकार्यांमुळेच शहराचे अतिक्रमण निघाले असल्याचा डांगोरा पत्रकाद्वारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी करीत आहेत. शहरातील लहान-मोठे टपरीधारक दुकानदार व्यवसायिक उद्ध्वस्त होत असताना लोकप्रतिनिधींनी कारवाई का रोखली नाही ?
प्रमोद लबडे पुढे म्हणाले,अधिकाऱ्याला शिवीगाळ कार्यालय तोडफोड केली त्याची शिक्षा शिवसैनिकांनी दहा बारा दिवस कैदेत राहून भोगली आहे. यामागे सुद्धा कोणाचा हात होता हे सत्य लपून राहिलेले नाही. न्यायालयात केस सुरू आहे न्यायालय देईल ती शिक्षा शिवसैनिक भोगतीलच पण मग त्याचा कोपरगावच्या अतिक्रमण काढण्याशी काय संबंध आहे ? दोन तीन जणांनी अधिका-याला दुखवले याचा बदला म्हणून दहा ते पंधरा हजार कुटुंबांना उध्वस्त करणे हा कुठला न्याय ? याचे समर्थन लोकप्रतिनिधी व त्यांचे समर्थक कसे काय करू शकतात ? गावातील शहरातील व्यावसायिक महाआघाडीतील शिवसैनिकपेक्षा याचा अर्थ बदलून गेलेला अधिकारी त्यांना मोठा आहे का? परंतु ज्या गावाने निवडून देऊन गावाच्या विकासाचे व संरक्षणाचे दायित्व तुमच्यावर सोपवले ते मात्र अधिकाऱ्यांची बाजू घेऊन शहराचे वाटोळे होत असताना अधिकाऱ्याला रोखू शकत नाही. ही कसली निती त्यांना या आडून शहरावर शिवसेनेवर सुड तर उगवायचा नाही ना ? अशी शंका येते असे लबडे म्हणाले,
तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे म्हणाले, अधिकाऱ्याच्या अरेरावी मुळे संतप्त शिवसैनिकांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असतील तर त्याचे लोकप्रतिनिधीला वाईट वाटण्याचे कारण काय ? त्यांच्यामुळेच कोपरगाव शहराच्या अतिक्रमणाचा विषय थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जावून कोपरगाव शहरातील अतिक्रमण नगरपरिषद प्रशासनाने काढले आहे. अधिकाऱ्याला मारून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत आणला व त्यामुळे अतिक्रमण काढले जात आहे असा बादरायण आरोप करणारे थेट पत्रक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या नावाने प्रसिद्ध होते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरविण्याचे काम लोकप्रतिनिधी करीत आहे आज कोपरगाव शहरातील दहा ते पंधरा हजार कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहे ही कुटुंबे कधीही लोकप्रतिनिधी माफ करणार नाही शिवसेनेच्या दुहीचा फायदा घेत आजपर्यंत लोकप्रतिनिधीने स्वतःच्या पोळीवर तूप ओढण्याचे काम केले आहे.
महाविकासआघाडी चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना केवळ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मला निधी दिला ? राष्ट्रवादी मुळेच कामे होत आहे ? राष्ट्रवादी मुळेच विकास होत आहे? असे आभासी चित्र जाणून-बुजून केले जात आहे. प्रत्येक भाषणात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना निवडून द्या अशी वल्गना केली जात आहे. याचा अर्थ कोपरगाव शहरात असलेली शिवसेना संपविण्याचे काम लोकप्रतिनिधी करीत आहे अशा संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेमध्ये शिवसेनेच्या गटात उमटत आहे