प्रशासकाची निवड, ही तर चोर वाटेने आपल्या कार्यकर्त्याची सोय – सौ स्नेहलता कोल्हे
सरपंचावर अन्याय; निर्णय मागे घ्या,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सौ स्नेहलता कोल्हेंची मागणी
वृत्तवेध ऑनलाईन 17 July 2020
By : Rajendra Salkar
कोपरगाव :
सत्ता हाती असलेले राज्यसरकार चोर वाटेने प्रशासक नेमून पडद्याआडून
आपल्या कार्यकर्त्याची सोय लावत असल्याचा घणाघाती आरोप भाजपाचे प्रदेश सचिव, माजी आ. सौ. स्नेहलता कोल्हे यांनी शुक्रवारी केला.
सरपंचावर अन्याय करणारा निर्णय मागे घ्या, ही मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे . तसेच सरपंचांना न्याय मिळून देण्यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणे याचे आदेश पारित झाले आहेत. राज्य शासनाच्या आदेशाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावातील योग्य व्यक्तीची निवड करावी असे नमूद करण्यात आले आहे. पण पालकमंत्री यांच्या शिफारशीने ही निवड करावी, असेही यात म्हटले आहे. पालकमंत्री यांचा योग्य व्यक्ती म्हणजे त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ताच असणार. त्यामुळे पालकमंत्री ज्या पक्षाचे त्याच पक्षाला न्याय मिळणार आहे, असे मत सौ. कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.
मागील सरकारने सरपंच निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. याला आघाडीचा विरोध होता. आज सत्तेत आल्यावर तो निर्णय बदलून सदस्यांमधून सरपंच निवड करण्यात आली. आता कोरोनामुळे निवडणूक लढवली जाऊ शकत नाही. अशावेळी सरपंच थेट पक्षाचा कार्यकर्ता (प्रशासक म्हणून) नियुक्त करावयाचा. असा अन्यायकारी निर्णय घेतला आहे. जर योग्य व्यक्तीची निवड करावयाची तर ग्रामसभेतून का नाही? असा सवाल सौ. कोल्हे यांनी केला आहे.
सौ. कोल्हे म्हणाल्या, गावगाडयात सरपंच यांना समस्यांची जाणीव सध्याच्या कोरोनाच्या संकटात प्रशासनाच्या बरोबरीने काम करून सरपंच महत्वाची भुमिका बजावत आहे. नेहमी जनतेत वावरणारे हे पद असल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात सरपंच पदाची गरिमा वाढविण्यासाठी मानधन वाढवुन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आणि ग्रामविकासाचे स्वप्न साकारण्यासाठी ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याचे काम केले आहे. शिर्डी येथे सरपंच परिषदेचे आयोजन करून सरपंचांच्या अडीअडचणी, समस्यां समजावून घेऊन त्याचे निराकरण करण्याचे काम केले होते. त्यामुळे निश्चितच ग्रामविकासाला चालना मिळून सरपंचावर मोठा विश्वास टाकून त्यांना सन्मानित करण्याचे काम केले. सरपंचांना न्याय मिळून देण्यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचा पुनरुच्चार सौ. कोल्हे यांनी शेवटी केला आहे .