कोपरगावच्या विकासाची प्रतिमा राज्यभर घेवून जाणार – मेहबूब शेख
The image of Kopargaon’s development will be carried across the state – Mehboob Sheikh
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Mon 30 May 2022, 17.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव :कोपरगावचा कायापालट करून निर्माण केलेली विकासाची प्रतिमा शरद संवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर घेवून जाणार आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले.शरद पवारांचे ना.आशुतोष काळे यांच्यावर विशेष प्रेम आहे.म्हणुन श्री साईबाबा संस्थान व रयत उत्तर विभाग ही दोन्ही अध्यक्षपदे त्यांना दिली असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश आयोजित शरद युवा संवाद यात्रा जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ना. आशुतोष काळे होते.
शेख पुढे म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत असतांना अहमदनगर जिल्हा आणि कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे खंबीरपणे उभा राहिला त्यामुळे आशुतोष काळे यांच्या रूपाने कोपरगावला कार्यक्षम आमदार मिळाला आहे. भाजपकडून वातावरण निर्मिती केली जाते की देशाचा जो विकास झाला तो २०१४ नंतरच झाला ७० वर्षात देशात कोणताही विकास झाला नाही असं सांगणारे भाजप कपड्याचा शोध देखील २०१४ नंतरच लागला एवढंच म्हणायचे बाकी राहिले आहे अशी कोपरखळी मारली. भारतीय जनता पार्टी ही भारत जलाव पार्टी आहे. जातीजातीमध्ये द्वेष निर्माण करायचा, भांडणे लावायचे काम भाजप करीत आहे. यापुढील काळात निवडणुकीच्या वेळी जातीय दंगली घडवायच्या किंवा भारत पाकिस्तान युद्ध करायचं असं काम भाजप कडून होणार आहे. भाजपची पहिली बी टीम एम आय एम होती, दुसरी सिटीम मनसे आहे. या दोन्ही टीमला महाराष्ट्र पेटविण्याची सुपारी देण्यात आली आहे.मात्र त्यांचे हे प्रयत्न कधी यशस्वी होणार नाही कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र असून पुरोगामी विचार जिवंत ठेवण्यासाठी शरद पवार नामक सह्याद्री महाराष्ट्रात खंबीरपने उभा आहे. २८८ आमदारांपैकी सदाबहार व्यक्तिमत्व ना.आशुतोष काळेंचे आहे. यापूर्वीचे कोपरगाव आम्ही पाहिले आहे आणि आताचे कोपरगाव पाहत असतांना विकासाच्या बाबतीत त्यांनी कोपरगावचा कायापालट केला आहे. तेंव्हा २०२४ ला ना. आशुतोष काळे ५० हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आले पाहिजे त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे असे आवाहन शेख यांनी केले.
ना.आशुतोष काळे म्हणाले की,पवार साहेबांनी देशाच्या व राज्याच्या राजकारणात पाच दशकांपेक्षा जास्त काळ दिलेलं योगदान शरद संवाद यात्रेच्या माध्यमातून युवा वर्गापर्यंत पोहोचण्याचं काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरु असून त्याचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे. सध्या देशात धर्माचा अभिमान आणि गर्व असल्याच्या भडकावू बातम्या पेरल्या जात असल्या तरी जगातील कोणताही धर्म दुसऱ्या धर्मावर अन्याय करण्याची शिकवण देत नाही.त्यामुळे तरुणाईने यापासून दूर राहावे व नागरिकांना देखील अशा भडकावू विचारांपासून दूर ठेवन्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे. आपल्याला खऱ्या अर्थाने विकासाची गरज आहे. आपल्याला चांगले रस्ते पाहिजे, शेतकऱ्यांना वेळेवर वीज आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले पाहिजे. उद्योग सुरळीतपणे सुरू राहतील त्यासाठी विकासाचे मूलभूत प्रश्न सुटणे गरजेचे आहे. यासाठी पवार साहेबांनी सातत्याने काम केले आहे. त्यांचे विचार समाजापर्यंत आणि घराघरात घेऊन जाण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
संदीप वर्पे, माधवराव खिलारी, चारुदत्त सिनगर व नवाज कुरेशी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, संतोष चवंडके, चारुदत्त सिनगर, नवाज कुरेशी, कृष्णा आढाव, सौ. प्रतिभा शिलेदार, कार्तिक सरदार, वाल्मिक लाहीरे, संदीप कपिले आदी मान्यवरांसह कोपरगाव तालुका राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक व युवक काँग्रेसचे कोपरगाव शहर व तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.