त्यांचा खटाटोप व पाहणी ही आम्ही केलेल्या विकासाची कबुलीच – विवेक कोल्हे
विकासाचा डोंगर चढताना आमदारांची दमछाक !
कोपरगाव – माजी आ. सौ स्नेहलता कोल्हे यांनी मतदार संघात केलेल्या विकासाचा डोंगर चढतांना विद्यमान आमदाराची दमछाक होत असून त्यांचा सुरु असलेला खटाटोप व पाहणी ही आम्ही केलेल्या विकासाची कबुलीच असल्याची मिस्कील टीका कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी केली.
नव्या आघाडी सरकार कडून अद्यापपर्यंत काही करता न आल्याने तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पाच वर्षांत निधी आणून विकासकामांचा डोंगर उभा केला, अनेक प्रश्न मार्गी लावले,प्रगतीपथावर असलेल्या या कामांची आमदाराकडून सुरू असलेली पाहणी म्हणजे आम्हीच विकास कामे करीत असल्याचे भासविण्याचा खटाटोप असल्याचा आरोप विवेक कोल्हे यांनी केला आहे.
तालुक्यातील रांजणगाव देशमुख व इतर सहा गांवे प्रादेशिक पाणी योजना कार्यान्वित करून परिसरातील जनतेला पाणी पुरवठा केला असे असताना आज आमदार फोटोसेशन करून आपणच काम केल्याची दिशाभूल करीत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक, अर्थसंकल्प, नाबार्ड अंतर्गत अनेक रस्ते, रवंदा-ब्राम्हणगांव रस्ता, जुना टाकळी रस्ता, कोकमठाण, जेऊर कुंभारी नवीन सबस्टेशन गोकुळनगरी पुल ३७ लाख, या अंतिम टप्प्यातील कामावर जाऊन पाहणी करण्याचे नाटक म्हणजे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या विकास कामाची कबुली असल्याचे विवेक कोल्हे म्हणाले.