घोयेगांवसह चार गावांना पिण्यांच्या पाण्याचे आरक्षणास मंजुरी द्यावी-विवेक कोल्हे
Reservation of drinking water should be approved for four villages including Ghoyegaon-Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 26July, 19.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : तालुक्यातील पुर्व भागातील घोयेगांव, गोधेगांव, आपेगांव, तळेगांवमळे व धोत्रे या पाच गावांना नांदुर मध्यमेश्वर जलद कालव्याअंतर्गत पिण्यांचे पाण्याचे आरक्षण मंजुर करावे अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता वैजापुर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
विवेक कोल्हे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोपरगांव तालुक्यातील घोयेगांव, गोधेगांव, आपेगांव, तळेगावमळे व धोत्रे या पाच गावांना पुर्वी दारणा धरणाच्या नांदुर मध्यमेश्वर जलद कालव्यातुन कोळनदीपात्रातील वैजापुर नगरपालिकेने आरक्षीत केलेल्या पाण्याच्या साठवण बंधा-याच्या पाझरामार्फत पाण्यांचा लाभ मिळत होता, परंतु गेल्या १० ते १२ वर्षापासुन वैजापुर नगरपालिकेने स्वतंत्र जागेत साठवण तलाव बांधुन कोळनदीपात्राऐवजी नविन साठवण बंधा-यातुन पाणी वापर सुरू केलेला आहे. त्यामुळे या गांवाना जिल्हा परिषदेमार्फत विहीरीतून केल्या जाणा-या पिण्याचे पाण्याचे पाणी व पशूसंवर्धनासाठी या योजना ओस पडलेल्या आहेत. सदर गावांचे पिण्याचे पाण्याचे आरक्षण नांदुर मध्यमेश्वर जलद कालव्याद्वारे मंजुर करून ते वितरीका क्रमांक एक चा फाटा कमांक वन आर मधुन पुर्ववत कोळनदीपात्रात बांधलेल्या साठवण बंधा-यात सोडण्यात यावे म्हणजे या गावांचा पिण्यांच्या व जनावरांचे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला जाईल तरी याप्रकरणी संबंधीत अधिका-यांनी तातडीने कार्यवाही राबवावी. कोपरगांव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व संबधीत अधिकारी यांच्याकडे याबाबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करून त्याचा प्रस्ताव मार्गी लागावा म्हणूनही पाठपुरावा सुरू आहे असे शेवटी विवेक कोल्हे म्हणाले.