शरद पवारांचा विश्वास सार्थ ठरविणार- आ. आशुतोष काळे

रयतचे नवनिर्वाचित उत्तरविभाग अध्यक्ष
वृत्तवेध ऑनलाईन July 2020
By: Rajendra Salkar
कोपरगाव : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा ठेवा व रयत शिक्षण संस्थेशी असलेली बांधिलकी जपत कर्मवीर शंकरराव काळे व परिवाराने रयतसाठी दिलेल्या योगदानाचे फलीत, असुन रयतचे अध्यक्ष खा. शरद पवारांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याची प्रतिक्रिया रयत शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित उत्तर विभाग अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या निवडीनंतर दिली.

सातारा येथे संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे पार पडलेल्या सभेत आमदार आशुतोष काळे यांची उत्तर विभाग अध्यक्ष पदी एकमताने निवड झाली. यावेळी इतरही विभागीय अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.
रयत शिक्षण संस्थेशी बांधिलकी ठेवून संस्थेच्या चेअरमनपदाची सलग पंधरा वर्ष जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळून रयत शिक्षण संस्थेचा विस्तार वाढविण्यात माजी खा. कर्मवीर शंकरराव काळे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्यानंतर माजी आ. अशोक काळे यांनी देखील रयत शिक्षण संस्थेसाठी सर्वोतोपरी मदत केलेली आहे. काळे परिवाराचा हा वारसा आमदार आशुतोष काळे यांनी पुढे चालवून रयत शिक्षण संस्थेची प्रगती करावी या उद्देशातून संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी हि जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली आहे.
आमदार आशुतोष काळे उच्च शिक्षित असून मागील पाच वर्षात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असतांना आदर्श कारभार करून कारखाना तोटामुक्त करून दाखविला आहे. निर्णय घेण्याची अफाट क्षमता व विधानसभा निवडणुकीत मिळविलेला विजय शरद पवार यांना विशेष भावला होता. कोपरगाव च्या निवडणुकीच्या जाहीर सभेत त्यांनी भविष्यातील महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख राजकारणी व्यक्तींमध्ये आशुतोष काळे यांना पाहत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
पश्चिम विभाग– एडवोकेट राम कांडगे, रायगड विभाग-आमदार बाळाराम पाटील, मध्य विभाग – संजीव पाटील, दक्षिण विभाग – माधवराव मोहिते यांचा समावेश आहे. या बैठकीसाठी संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, सचिव, सेक्रेटरी व सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य उपस्थित होते.
चौकट – कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आदर्श विचारांवर कर्मवीर शंकरराव काळे केलेल्या कार्याची दखल घेवून काळे परिवाराचा वारसा पुढे चालविण्याची आदरणीय खा.शरद पवार यांनी जबाबदारी दिली. त्याबद्दल रयत परिवाराचा अत्यंत आभारी आहे. माझ्यावर टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडून टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार – आमदार आशुतोष काळे





