श्रद्धा आणि सबुरी”मंत्र आचरणातआणा,कोपरगावची संस्कृती जपा -बिपीन कोल्हे
Practicing the Shraddha and Saburi mantra, preserve the culture of Kopargaon – Bipin Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 22 Aug, 17.00
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : श्री साईबाबांनी संपूर्ण जगाला ‘श्रद्धा आणि सबुरी’ चा संदेश दिला आहे साई संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे व सर्व युवा नेते व कार्यकर्त्यांनी “श्रद्धा आणि सबुरी” हा मंत्र आचरणात आणून कोपरगाव ची संस्कृती जपावी असा वडीलकीचा सल्ला संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी गेल्या आठवड्यात दहीहंडीच्या स्वागत कमानी लावण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यात जो राडा झाला. त्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रियावर बिपीन कोल्हे यांनी दोन्ही युवा नेत्यांना दिला.
कोपरगाव तालुक्यातील काळे आणि कोल्हे घराण्यातील पारंपरिक राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. माजी खासदार स्व. शंकरराव काळे आणि माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे हे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी होते. या दोन्ही नेत्यांनी आपल्या हयातीत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून राजकीय संघर्ष केला; परंतु तालुक्याच्या विकासामध्ये कधीही टोकाचे राजकारण केले नाही. राजकारणात हे दोन्ही नेते अनेकदा परस्परांविरुद्ध लढले. मात्र, जनहिताच्या प्रश्नांवर त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यांनी आपल्या आयुष्यात सदैव समंजसपणाचे आणि शालिनतेचे राजकारण केले. त्यांनी कधीही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही.
सामान्य जनता कोविड महामारीतून आता कुठेतरी बाहेर पडत आहे तसेच बाजारपेठही सावरत आहे. व्यापारी वर्ग ही या आर्थिक संकटातून सावरत आहे. इथून पुढे आपले सर्व धर्मीय सण व उत्सव सुरु होत आहेत . त्याचा परिणाम शहराच्या व तालुकाच्या बाजारापेठेवर सकारात्मक दिसत आहे अशा वेळी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका व जबाबदारीचे भान ठेवण्याची गरज असून शहराची सामाजिक शांतता व आर्थिक स्थैर्य बिघडेल असे कृत्य कुणीही करू नये अशी सूचना वजा समज बिपिन कोल्हे यांनी दिला.
सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी आपल्याला समोरचा माणूस कितीही बेताल वक्तव्य करत असला तरी सबुरीने वागण्याची शिकवण दिली असून तीच आचरणात आणूया. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शांतता बाळगावी. आपल्याला सर्वसामान्य जनतेला, व्यापाऱ्यांना वेठीस धरायचे नाही. त्यांना त्रास होईल असे काही करायचे नाही. कार्यकर्त्यांनी आपला संयम ढळू न देता समंजसपणे वागावे, असे आवाहन बिपीनदादा कोल्हे यांनी केले आहे. तालुक्याच्या विकासासाठी आमदार काळे यांनी राजकारण बाजूला ठेवून राजकीय विरोधकांसोबत एकत्र बसून चर्चा केली पाहिजे, असा सल्लाही बिपीन कोल्हे यांनी दिला आहे.
Post Views:
207