शहरात लॉकडाऊन लागू करण्याची अफवा – योगेश चंद्रे

शहरात लॉकडाऊन लागू करण्याची अफवा – योगेश चंद्रे

कोरोना रुग्ण अपडेट : बाधित रूग्ण एकुण – १५ पैकी ग्रामीण (१३) शहर (२)

सुरेगाव ९ करंजी १, शामवाडी १,धारणगाव १, सहजानंदनगर १, तर शहरात इंदिरापथ श्रध्दा पॅरडाईज १, व सुखशांतीनगर १,

                    कोरोना व्हायरस

वृत्तवेध ऑनलाइन । 19 July 2020
3.45 PM
By: Rajendra Salkar

कोपरगाव : शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने येत्या दोन दिवसांत संपूर्णपणे लॉकडाऊन केला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भातील कोणतीही चर्चा अथवा प्रस्ताव नसून केवळ अफवा पसरविल्या जात असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.

त्याबाबत चर्चा केली असता तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले, राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. तेथील स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. काही शहरांनी दहा, तर काही शहरांनी पंधरा दिवसांसाठीचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. अशाच प्रकारे कोपरगावमध्येदेखील लॉकडाऊन जाहीर होणार असल्याच्या चर्चेला शनिवारपासून तोंड फुटले आणि लॉकडाऊन करण्यासंदर्भातील अफवा वेगाने पसरत आहे. हे चुकीचे आहे. ज्या भागामध्ये कोरोना रुग्ण आढळला तोच भाग फक्त कन्टोन्मेंट झोन जाहिर केला जात आहे. उलट सुलट अफवा कुणी पसरवू नये व अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले, अफवा पसरवणारे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी तंबीही तहसीलदार चंद्रे यांनी दिली.

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचेदेखील प्रमाण वाढले आहे. कन्टन्मेंट झोनदेखील कमी झाले आहेत. रुग्ण आढळणा-या भागात तत्काळ उपाययोजनादेखील केल्या जात आहेत. कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयाने जाहीर केलेल्या अहवालानुसार शहर व तालुक्यातील १२ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर १५ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोपरगाव शहर व तालुक्यात आजमितीला पंधरा जण कोरोना बाधित असून यात सुरेगाव येथील ९ जण, करंजी येथील एक महिला, शामवाडी येथील एक पुरुष, याचबरोबर शहरातील इंदिरा पथ तेरा बंगले समोरील श्रध्दा पॅरडाईज इमारत एक रुग्ण, व सुखशांतीनगर येथे एक रुग्ण आढळून आला असून हा भाग कन्टोनमेंट झोन करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सहजानंदनगर एक व धारणगाव येथील एक रुग्ण आढळून आला आहे. याव्यतिरिक्त कुठेही रुग्ण आढळलेले नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या भागांचा नावाची चर्चा करून नागरिकांना घाबरवू नका, व अफवा पसरविणे बंद करा, अशा सक्त सुचना तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिल्या आहेत.

कोरोना रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी तालुका ग्रामीण रुग्णालय तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाकडून व्यापक प्रयत्न सुरू आहेत. शनिवार वगळता कोपरगाव शहरातील दैनंदिन व्यवहार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यवस्थित सुरू आहेत. सायंकाळी ७ नंतर पोलिसांनी संचारबंदी लागू केलेली आहे. तसेच स्वतःची काळजी घ्या, काम असेल तर घराबाहेर पडा, असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page