तज्ञांमार्फत कोपरगाव तालुक्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करणार – विवेक कोल्हे 

तज्ञांमार्फत कोपरगाव तालुक्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करणार – विवेक कोल्हे 

Kopargaon taluka development blueprint will be prepared by experts – Vivek Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 4 Sep, 17.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : साधू, संत, महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक वारसा लाभलेल्या कोपरगाव तालुका इतिहासाने, परंपरेने खूप श्रीमंत असला, विकासात मागास  आहे. हा खुंटलेला विकास मर्यादित संसाधनातून तरुणांच्या संकल्पनेतील शहर व तालुक्याचा विकास उतरविण्यासाठी  तज्ज्ञांच्या समितीमार्फत वाढती लोकसंख्या विचारात घेऊन दूरगामी नियोजन व सर्वंकष विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार  करणार असल्याची भूमिका  संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केली.

विवेक कोल्हे म्हणाले, एक प्रगत आणि संपन्न कोपरगावचे स्वप्न साकार करतांना पुढील २५-३० वर्षांत सर्वांगीण विकास कसा करता येईल, याच्या अभिनव संकल्पना या ब्ल्यू प्रिंटमध्ये असतील. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, वीज या मूलभूत गरजांची पूर्तता, पाण्याचे नियोजन, दळणवळणाची सुविधा, दर्जेदार जीवनमान, सार्वजनिक स्वच्छता, उद्याने, क्रीडांगण, प्राथमिक व उच्च शिक्षण, व्यवसाय शिक्षण, रोजगार, कृषी, पर्यटन, साहित्य, कला, क्रीडा, पर्यावरण, सक्षम स्थानिक प्रशासन, औद्योगिक धोरण, शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी विविध सुविधा, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेजलाईनचे जे पाणी गोदावरी नदीत मिसळते तेथे सांडपाणी प्रकल्प उभारणी अशा विविध विकास कामात लोकसहभाग या व अशा अनेक विषयांवर सखोल अभ्यास करून त्यावरील कृती योजना आम्ही या विकास आराखड्यातून मांडणार आहोत. आम्ही बनवत असलो तरी हा आराखडा कुण्या एका व्यक्तीचा, एका पक्षाचा नाही. 
कोल्हे पुढे म्हणाले की,  विकासकामे केवळ कागदोपत्री दिसत आहेत. पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी कमी पडतेय. कोपरगावच्या हक्काचे पाणी इतरत्र वळवले जात आहे.  नगर परिषद प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पाण्याची समस्या गंभीर बनली आहे.  सर्व नागरिकांना व्यवस्थित व मुबलक पाणी मिळण्यासाठी वितरण व्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे, निळवंडे धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे कोपरगावपर्यंत पाणी आणण्याच्या योजनेला गती देण्याची आज नितांत गरज आहे असेही  त्यांनी सांगितले.
साई समाधी शिर्डी साई तपोभूमी शुक्राचार्य मंदिर आत्मा मालिक ज्ञानपीठ महानुभव आश्रम आदीसह प्रसिद्ध धार्मिक स्थळे, समृद्धीसह  भारतातील सर्व टोकांना जोडणारे विविध महामार्गाचे जाळे,काकडी विमानतळ   भारतातील सर्व गाड्यांच्या थांबा असलेले कोपरगाव रेल्वे स्टेशन संजीवनी उद्योग समूह  सहकारी साखर कारखाने  बँका पतसंस्था दूध संघ,  संजीवनी शिक्षण संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, सैनिकी स्कूल, आयुर्वेद महाविद्यालय, रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालये, सोमैय्या उद्योग समूहाचे के, जे. सोमैय्या कॉलेज,  इंटरनॅशनल स्कूल अशा विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे  बीपीओ कॉल सेंटर, क्लस्टर असे असताना तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवून विकासाला चालना देण्यासाठी देशात आणि राज्यात सध्या भाजपचे सरकार सत्तेत आहे. या सरकारच्या माध्यमातून  आपण प्रयत्नशील आहोत.  त्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page