अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे बांधावर जावून पंचनामे करा –आ. आशुतोष काळे
Go to dam and make panchnama of crops damaged due to heavy rain -A. Ashutosh Kale
कोपरगाव : मागील काही दिवसांपासून तालुक्यातील कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहेगाव, पोहेगाव या पाचही महसूल मंडलातील सर्वच गावांमध्ये सातत्याने अतिवृष्टी होत असल्यामुळे शेतातील सोयाबीन, मका, बाजरी, कांदा रोप आदी उभ्या पिकांचे व फळबागा तसेच भाजीपाला पिकांचे आदी मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची गंभीर परिस्थिती पाहता या पिकांचे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून तातडीने पंचनामे करावे अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे तालुक्याची पावसाची सरासरी ३३६.०५ एवढी असतांना आजवर कोपरगाव तालुक्यात ५२५.२० मी.मी. पाऊस पडला असून हि सरासरी १५६% आहे. यामध्ये सर्वात जास्त पोहेगाव महसूल मंडलात सर्वात जास्त ६४७ मी.मी. म्हणजेच १९२ % तसेच सुरेगाव १८७%, कोपरगाव १३१ %, रवंदे १४३ % व सर्वात कमी दहेगाव मंडलात १२५ % अशा प्रकारे पर्जन्यमान झाले आहे.
ज्याप्रमाणे खरीप पिकांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे त्याप्रमाणे फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज शेतात पाणी साचले असल्यामुळे सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातून जाणार आहे. हवामान खात्याकडून अजून काही दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून परतीचा पाऊस बाकी आहे. त्यामुळे या सर्व पिकांचे लवकरात लवकर अचूक पंचनामे होणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळवून देता येईल. त्यासाठी तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून सर्व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.
Post Views:
168