कोपरगाव
तालुक्यातील मळेगाव थडी,ब्राम्हणगाव येथे शनिवार (दि.२७) रोजी सायंकाळी झालेल्या पावसामुळे काही नागरिकांच्या घरात पाणी घुसून संसारोपोयोगी साहित्य भिजले होते. काही शेतकऱ्यांनी साठविलेल्या कांदा चाळीत पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले याचे तातडीने पंचनामे करा असे आदेश आमदार आशुतोष काळे यांनी दिले.
तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव याच्या समवेत झालेल्या नुकसानीची पाहणी करून आ.काळे यांनी नागरिकांना दिलासा दिला .
शनिवारी मळेगाव थडी, दवंगे वस्ती तसेच ब्राम्हणगाव याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. रवंदा शिवाराकडून मळेगाव शिवाराकडे असलेला उतार व रवंदा-मळेगाव थडी रस्त्याचे कामामुळे काही ठिकाणी चर बुजले गेल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. अतिवृष्टीमुळे वाड्या वस्त्यांवर जाणारे रस्ते नाहीसे होतात हे रस्ते नकाशावर नाहीत त्यामुळे या रस्त्यांचा विकास होत नाही त्यासाठी हे रस्ते नकाशावर घेण्याच्या सूचना तहसीलदारांना आ. काळे यांनी दिल्या.
अशी संकटे वारंवार उदभवू नये यासाठी ग्रामसेवक, तलाठी यांनी प्रस्ताव तयार करावे. तसेच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेवून पंचनामे पूर्ण करून अहवाल महसूल विभागाकडे पाठवा मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. काळे यांनी शेवटी सांगितले.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक विठ्ठल आसने, अरुण चंद्रे, प.सं. सदस्य श्रावण आसने, जिनिंगचे संचालक किसान आहेर, मळेगाव थडीचे सरपंच गोरख दवंगे, उपसरपंच विलासं दवंगे. दिलीप दवंगे, कोंडाजी खोंड, गोविंद दवंगे, अरुण दवंगे, तलाठी आर.पी. सोनवणे, तलाठी नानासाहेब जावळे, ग्रामसेवक बी. ओ. पाटील, ग्रामसेवक एफ.एम.तडवी आदी उपस्थित होते.





