विमा कंपनीने १४ हजार शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत नुकसान भरपाई द्यावी – आ. आशुतोष काळे
The insurance company should compensate 14 thousand farmers within Diwali. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 18 Oct , 8.20 am
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील जवळपास १३ हजार ८१७ शेतकऱ्यांनी खरीप पिकांची विमा रक्कम भरलेली आहे. या सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनीने दिवाळीच्या आत सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.
पावसाळा सुरु झाल्यापासून आजतागायत पाऊस सुरूच असल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही अशी परिस्थिती आहे. सरकारकडून जरी मदत देण्यात येणार असली तरी त्या मदतीतून होणाऱ्या नुकसानीची भरपाई होणार नाही. मात्र शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळेल या आशेवर खरीप पिकांचा विमा उतरवून पिक विम्याची रक्कम सबंधित कंपनीकडे भरलेली आहे. झालेल्या सर्व नुकसानीचे महसूल व कृषी खात्यामार्फत पंचनामे करण्यात आले आहे.
करण्यात आलेल्या या पंचनाम्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने मुदतीच्या आत शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर देणे बंधनकारक होते. त्यामुळे बहुतांश नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे सादर केलेली आहे. मात्र काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी आल्यामुळे अनेक शेतकरी आपल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीने मुदतीच्या आत विमा कंपनीच्या अधिकृत संकेत स्थळावर देवू शकले नाही. त्यामुळे नुकसान होवून देखील या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या भरपाई पासून वंचित राहावे लागू शकते. खरिपाच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची पूर्व तयारी करण्यासाठी आर्थिक अडचणी येणार असून दिवाळी सण साजरा करणे देखील शेतकऱ्यांना जिकीरीचे होणार आहे. त्यासाठी विमा कंपनीने तालुक्यातील महसूल व कृषी विभागाने जे पंचनामे केलेले आहेत ते सर्व पंचनामे गृहीत धरून सरसकट ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिकाचे विमा कवच घेतले आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट खरीप पिकाच्या विम्याची रक्कम दिवाळीच्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.