शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून १०० टक्के नुकसान भरपाई मिळवून द्यावी -स्नेहलता कोल्हे
Government should get 100 percent compensation from crop insurance companies to farmers – Snehlata Kolhe
जिल्हा नियोजन वार्षिक योजना आढावा बैठकीत स्नेहलता कोल्हे यांनी मांडला पीक विम्याचा मुद्दा In the district planning annual plan review meeting, Snehalata Kolhe raised the issue of crop insurance
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat19 Nov , 18.50 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : यंदा अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान होऊन खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र, पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसान भरपाई देऊन त्यांची निव्वळ थट्टा केली आहे. शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने १०० टक्के नुकसान भरपाई अदा करण्याबाबत पीक विमा कंपन्यांना निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी अहमदनगर येथे झालेल्या जिल्हा नियोजन वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत केली.
महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन वार्षिक योजनेसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामांसंदर्भात आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार बबनराव पाचपुते, प्रा. राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, खा.डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सौ स्नेहलता कोल्हे यांनी पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या नुकसानीच्या आणि त्यांनी पीक विम्यापोटी भरलेल्या रकमेच्या तुलनेत नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा मुद्दा मांडला. अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) सुरू केलेली आहे. यावर्षी कोपरगाव तालुक्यातील सुमारे १३ हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील वेगवेगळ्या पिकांचा विमा उतरवून ११०० रुपये याप्रमाणे विम्याचा हप्ता भरला. तसेच केंद्र आणि राज्य शासनाने मिळून सुमारे ७ कोटी रुपये पीक विम्याची रक्कम भरली. अतिवृष्टीमुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ५७ कोटी रुपये मिळायला हवे होते; परंतु पीक विमा कंपन्यांकडून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना फक्त १ कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे १०० टक्के नुकसान झालेले असतानादेखील विविध पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना अत्यंत अल्प प्रमाणात नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. अनेक शेतकरी अजूनही पीक विम्याच्या लाभापासून वंचित असून, संबंधित विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या प्रकरणात शासनाने त्वरित लक्ष घालून
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संबंधित पीक विमा कंपन्यांकडून तातडीने १०० टक्के नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली.