ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यांच्या १२२ जागा जिंकून भाजप कोल्हे गट नंबर वन 

ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यांच्या १२२ जागा जिंकून भाजप कोल्हे गट नंबर वन

Grupo BJP Kolhe número uno al ganar 122 escaños de miembros en las elecciones de Gram Panchayat

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue20 Dec22 , 20.30 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अर्थात कोल्हे गटाने दणदणीत विजय मिळविला असून, सरपंच पदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत ९ ग्रामपंचायतींमध्ये कोल्हे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांच्या एकूण २५७ जागांपैकी १२२ जागा जिंकून कोल्हे गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हे गटाने जोरदार मुसंडी मारली असून, ग्रामपंचायत सदस्यांच्या सर्वाधिक जागा जिंकून भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने अर्थात कोल्हे गटाने घवघवीत यश मिळवून आपले वर्चस्व कायम राखले आहे. सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे बिपीनदादा कोल्हे, स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील एकूण २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (१८ डिसेंबर) मतदान झाले. त्यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या राहाता तालुक्यातील न. पा. वाडी आणि कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींचा समावेश होता. यंदा सरपंच पदासाठी थेट निवडणूक झाल्याने या निवडणुकीस मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (२० डिसेंबर) कोपरगाव येथे करण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात आले. अंतिम निकालानंतर शिंगणापूर, धारणगाव, खिर्डीगणेश, करंजी, खोपडी, तळेगाव मळे, सोनेवाडी, देर्डे कोऱ्हाळे, बहादराबाद या ९ ग्रामपंचायतींचे सरपंचपद कोल्हे गटाकडे आले आहे, तर ग्रामपंचायत सदस्यांच्या एकूण २५७ जागांपैकी १२२ जागा कोल्हे गटाने जिंकल्या असून, प्रतिस्पर्धी काळे गटाचे १४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवडून आले असून, परजणे गटाचा १, शिवसेना १ तसेच २ ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आले आहेत. ग्रामपंचायतींच्या सदस्य पदाच्या निवडणुकीत भाजप म्हणजेच कोल्हे गटाने एकूण २५७ पैकी सर्वाधिक १२२ जागा जिंकून आघाडी घेतली असून, काळे गटाला (राष्ट्रवादी काँग्रेस) फक्त ११४ जागा मिळाल्या आहेत. परजणे गटाला ४, शिवसेनेला ६ जागा मिळाल्या आहेत, तर ११ ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिंगणापूर ग्रामपंचायतीवर कोल्हे गटाने झेंडा फडकवला असून, सरपंच पदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत कोल्हे गटाचे (भाजप) उमेदवार डॉ. विजय दादा काळे हे २३०० मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या ठिकाणी कोल्हे गटाचे १४ सदस्य निवडून आले असून, काळे गटाला फक्त ३ जागा मिळाल्या आहेत. खिर्डीगणेश ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हे गटाची सरशी झाली असून, चंद्रकांत चांदर हे ५०० मतांनी सरपंच पदी निवडून आले आहेत. ग्रा. पं. सदस्यांच्या ८ जागा कोल्हे गटाने जिंकल्या आहेत. खोपडी ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत कोल्हे गटाच्या विठाबाई वारकर यांनी १२७ मतांनी विजय मिळवला आहे. या ग्रा. पं. मध्ये कोल्हे गटाचे ३ सदस्य विजयी झाले असून, काळे गटाला ४ जागा मिळाल्या आहेत. करंजी ग्रामपंचायत पुन्हा कोल्हे गटाच्या ताब्यात आली असून, या ठिकाणी सरपंचपदी कोल्हे गटाचे रवींद्र आगवन हे २०८ मताधिक्य मिळवून विजयी झाले आहेत, तर एकूण ११ सदस्यांपैकी ६ जागा कोल्हे गटाला तर ५ जागा काळे गटाला मिळाल्या आहेत. तळेगाव मळे ग्रामपंचायतमध्ये कोल्हे गटाच्या आरती टुपके ४६ मतांनी सरपंचपदी निवडून आल्या आहेत, तर ग्रा. पं. सदस्यांच्या ६ जागाही कोल्हे गटाने जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. काळे गटाला अवघ्या ३ जागा मिळाल्या आहेत.
धारणगाव ग्रामपंचायत कोल्हे गटाच्या ताब्यात आली असून, सरपंचपदाच्या निवडणुकीत कोल्हे गटाच्या वरुणा चौधरी यांनी १७६ मतांनी विजय संपादन केला आहे. या ग्रामपंचायतमध्ये सदस्य पदाच्या निवडणुकीत कोल्हे गटाच्या ९ उमेदवारांनी विजय मिळवला आहे, तर काळे गटाला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले. देर्डे कोऱ्हाळे ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत कोल्हे गटाच्या नंदा गवळी या २१६ मतांनी विजयी झाल्या आहेत. या ग्रा. पं. मध्ये कोल्हे गटाचे ४ सदस्य विजयी झाले असून, काळे गटाला ५ जागा मिळाल्या आहेत. सोनेवाडी ग्रामपंचायतमध्ये कोल्हे गटाच्या शकुंतला गुडघे यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत ५२४ मतांनी विजय मिळवला असून, या ठिकाणी कोल्हे गटाचे ९ सदस्य भरघोस मतांनी निवडून आले आहेत, तर काळे गटाला फक्त ४ जागा मिळाल्या आहेत. बहादराबाद ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत कोल्हे गटाच्या अश्विनी पाचोरे यांनी १२६ मतांनी विजय मिळवला आहे. डाऊच (खु.) ग्रामपंचायतमध्ये कोल्हे गटाचे ६ सदस्य विजयी झाले आहेत, तर काळे गटाला २ जागा व अपक्षाला १ जागा मिळाली आहे. वेस-सोयगाव ग्रामपंचायतमध्ये कोल्हे गटाचे २ सदस्य विजयी झाले आहेत.
वडगाव येथे ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत कोल्हे गटाला १, मोर्वीस ग्रामपंचायतमध्ये २, चासनळी ग्रामपंचायतमध्ये ६, हंडेवाडी ग्रामपंचायतमध्ये ६, माहेगाव देशमुख ग्रामपंचायतमध्ये १, बक्तरपूर ग्रामपंचायतमध्ये २, चांदेकसारे ग्रामपंचायतमध्ये २, डाऊच (बु.) ग्रामपंचायतमध्ये १, पढेगाव ग्रामपंचायतमध्ये १०, रांजणगाव देशमुख ग्रामपंचायतमध्ये ८, बहादरपूर ग्रामपंचायतमध्ये ३, शहापूर ग्रामपंचायतमध्ये ४, सडे ग्रामपंचायतमध्ये २, कोळपेवाडी ग्रामपंचायतमध्ये ४ आणि न. पा. वाडी ग्रामपंचायतमध्ये ६ जागा मिळाल्या आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत कोल्हे गटाने सर्वात जास्त जागा मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page