“धवलक्रांती-हरितक्रांतीनंतर आता ‘ऊस क्रांती’च हवी!” — बिपिन कोल्हेंची सरकारला विनंती
After the White Revolution and the Green Revolution, we need a ‘Sugarcane Revolution’!” — Bipin Kolhe’s request to the government
एमएसपी आधी, मग एफआरपी व इथेनॉल दर निश्चित करा; रिकव्हरीप्रमाणे उसाला दर हवा,
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb28 sat.14.00 Pm. By सालकर राजेंद्र
कोपरगाव:सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६३ व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी साखर उद्योगातील धोरणांवर अभ्यासपूर्ण भाष्य करत“धवलक्रांती आणि हरितक्रांतीप्रमाणे आता देशात ऊस क्रांती घडविण्याची गरज आहे,” असा ठाम उच्चार केला.
६३व्या गळीत हंगामाची सांगता संचालक निलेश देवकर व सौ. सोनल देवकर यांच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजेनंतर करण्यात आली.
“गहु,दूध, कापूस, द्राक्षांना दर्जानुसार दर… मग उसाला का नाही?”
ते म्हणाले की, गहु,दूध, कापूस, द्राक्षांना दर्जानुसार दर मिळतो; मग उसाला का नाही? असा थेट सवाल करत त्यांनी “८०-९० टन प्रति एकर उत्पादन देणाऱ्या सुधारित जाती विकसित करा.रिकव्हरीनुसार दर देण्याची पद्धत अनेक देशांत आहे. भारतातही ती लागू करावी लागेल. कटू असलं तरी हेच वास्तव आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
एफआरपी वाढते, पण एमएसपी नाही हि विसंगती
“साखर उद्योग टिकवायचा असेल तर प्रथम एमएसपी दर निश्चित करा, त्यानंतर एफआरपी जाहीर करा आणि मग इथेनॉलचे दर ठरवा, अशी स्पष्ट मागणी त्यांनी राज्य व केंद्र सरकारकडे केली. “दरवर्षी एफआरपी वाढते; पण एमएसपी त्यानुसार वाढत नाही. ही विसंगती उद्योगाला उध्वस्ततेकडे नेत आहे,” असल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली.
‘काटा मारी’ निर्णय स्वागतार्ह; पण केंद्रस्तरीय मॉनिटरिंग हवे !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला ‘काटा मारी’चा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत त्यांनी काट्यावर थेट केंद्रस्तरीय मॉनिटरिंगची सूचना केली, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मनातील संशय दूर होईल, असेही त्यांनी नमूद केले.
लोकप्रतिनिधी कारखानदार… पण भूमिका कोठे? ”
साखर कारखानदारीतील वाढत्या संकटावर बोलताना त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला —
“आज अनेक लोकप्रतिनिधी स्वतः कारखानदार आहेत; पण सहकाराबाबत स्पष्ट भूमिका घेत नाहीत. भीतीपोटी गप्प बसायची वेळ आली आहे का?”
स्व. शंकरराव कोल्हे यांनी स्वतःच्या सरकारविरोधात जाऊन शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या भूमिकेची आठवण करून देत त्यांनी स्वतःला साखर तज्ञ म्हणविणाऱ्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली.
१० हजार कोटीचा टॅक्स प्रश्न मार्गी
गेल्या ४० वर्षापासून सहकारी साखर कारखान्यावर टांगती तलवार ठरलेला दहा हजार कोटीचा इन्कम टॅक्स प्रश्न नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या काळात मार्गी लागल्याची त्यांनी पुरूच्चाराने नोंद घेतली
“कारखाने ९० दिवसांवर येतील!” — क्षमता वाढ धोरणावर टीका
“आज कारखाने तीन-साडेतीन महिनेच चालतात. अशीच परिस्थिती राहिली तर ते ९० दिवसांवर येतील,” असा इशारा देत त्यांनी क्षमता वाढीच्या चुकीच्या धोरणावर टीका केली.“सहा महिने कारखाने चालतील अशी धोरणात्मक तरतूद व्हायला हवी होती,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“आमच्या क्षेत्रात आला तर आम्हीही जाऊ!” — ऊस पळवण्यावर संताप
कार्यक्षेत्रातील उसाच्या अलिखित करारावर बोट ठेवत त्यांनी जीव घेण्याच्या स्पर्धेचा उल्लेख करताना श्री गणेश सहकारी साखर कारखाना च्या कार्यक्षेत्रातील ऊस पळवण्याच्या प्रकारांवर त्यांनी संताप व्यक्त केला.“जर कोणी आमच्या कार्यक्षेत्रात येत असेल, तर आम्हीही त्यांच्या क्षेत्रात जाऊ शकतो. तेवढी ताकद आमच्यात आहे,” असे ठणकावून सांगितले
“आधुनिकीकरण केले; पण प्लॅनिंग चुकले!” संजीवनी कारखान्याच्या कामकाजावर बोलताना त्यांनी अंतर्गत त्रुटीवरही बोट ठेवले आधुनिकीकरण केले पण नियोजनात चूक झाली सहावा महिना वाया गेला संपूर्ण अहवाल घेऊन दोषीवर कारवाई करणार असा क** इशारा त्यांनी दिला
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष पराग संधान, सभापती साहेबराव रोहोम, अधिकारी शिवकुमार, जनरल मॅनेजर शिवाजी दिवटे, विश्वासराव महाले, अरुण येवले, आदिसह सर्व संचालक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक एम. आर. यादव यांनी गाळपाच्या आढावा घेतला. तर सूत्रसंचालन संचालक बाळासाहेब वक्ते यांनी केले विविध पदाधिकारी, संचालक, शेतकरी सभासद व अधिकारी उपस्थित होते. शेवटी आभार व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर परजणे यांनी मानले.
चौकट
‘ऊस क्रांती’चा बिगुल?
बिपिन कोल्हे यांचे भाषण केवळ उद्योगपर भाष्य नव्हते; ते धोरणकर्त्यांना केलेली थेट विनंती होती.यामुळे साखर उद्योग, सहकार आणि शेतकरी राजकारणाच्या पातळीवर आता मोठे बदल घडवण्याची मागणी उघडपणे समोर आली आहे.धवलक्रांती, हरितक्रांतीनंतर आता देश ‘ऊस क्रांती’कडे वाटचाल करणार का?याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Post Views:
2





