सृष्टी निर्मितीची शक्ती ही स्त्रीला मिळालेली दैवी देणगी- सौ. राजश्री मालेगावकर

सृष्टी निर्मितीची शक्ती ही स्त्रीला मिळालेली दैवी देणगी- सौ. राजश्री मालेगावकर

The power of creation is a divine gift given to woman- Mrs. Rajshree Malegaonkar

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu29 Dec22 , 18.10 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव- स्त्रीच्या मासिक पाळीतूनच गर्भधारणा होऊन सृष्टी उभी राहू शकते. असे असतानाही मासिक पाळीला प्रॉब्लेम, अडचण, विटाळ असे शब्द वापरले जातात. ही शब्दयोजनाच मासिक पाळीविषयीचा दूषित दृष्टिकोन दाखविणारी आहे. खरे तर,स्त्रीला मिळालेली सृष्टी निर्मितीची शक्ती व त्यासाठी आवश्यक मासिक पाळी म्हणजे स्त्रीला नवनिर्मितीची मिळालेली दैवी देणगीच आहे” असे प्रतिपादन सम्राट फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि सोशल अवेअरनेस मिशनच्या सौ. राजश्री मालेगावकर यांनी केले.

येथील एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये नुकताच ‘महिला कल्याण व स्त्री सबलीकरण आणि ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ द्वारे आयोजित ‘महिला आरोग्य  जागृती’ कार्यक्रम संपन्न झाला. त्याप्रसंगी सौ. मालेगावकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य  डॉ. रमेश सानप होते
विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्यांनी पुढे सांगितले की, महिलांची तडजोडवादी वृत्तीच त्यांना स्वतःकडे दुर्लक्ष करायला शिकविते. परिणामी महिला वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात. सध्या महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक असून अशा आजारांची लागण महिलांमध्ये विषाणूंमधून होते. त्यात सॅनिटरी पॅडच्या वापराचा मोठा भाग असतो. त्यामुळे या पॅडचा वापर करण्याबाबतची जाणीव जागृती स्त्रियांमध्ये होणे अतिशय गरजेचे आहे. प्रात्यक्षिकासह पॅड व त्यामधील प्लास्टिकचे दुष्परिणाम त्यांनी उपस्थितांच्या लक्षात आणून दिले. त्याचबरोबर ऑरगॅनिक पॅडचे वेगळेपण दर्शवून हे पॅड स्त्रियांनी वापरणे आरोग्य व पर्यावरणदृष्ट्या देखील कसे हितकारक आहे, हे दाखवून दिले. प्रश्नोत्तराच्या सत्रात सौ. मालेगावकर यांनी विद्यार्थिनींच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत मासिक पाळी व  त्यामधील विविध बाबींसंबंधाने  विद्यार्थिनींच्या  शंकांचे  निरसन करत आरोग्याचे महत्त्व पटवून दिले.
प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी, “आरोग्य हीच व्यक्तीची, देशाची धनसंपदा असून,व्यक्तिगत स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेची सवय ही संपत्ती वाढविण्यात  महत्त्वाची भूमिका बजावते. आरोग्याचा प्रारंभिक संबंध जसा स्वच्छतेशी,तसा स्वच्छतेचा संबंध संस्कृतीशी आहे. त्यामुळे आपण कुठे व किती स्वच्छता ठेवतो? त्या संबंधाने कशी वर्तणूक करतो? यावरून आपली संस्कृती ठरते.” असे सांगून त्यांनी माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी चालविलेल्या स्वच्छ भारत अभियानाची आठवण करून दिली. या अभियानात सहभागी होत स्वच्छता राखणे व इतरांना स्वच्छतेची सवय लावणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रास्ताविक समिती प्रमुख डॉ. उज्ज्वला भोर यांनी केले. सूत्रसंचालक  डॉ. सीमा चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाला सोशल अवेअरनेस मिशनच्या सुपरवायझर तनुजा गायकवाड,डॉ.रंजना वर्दे, रोहिणी डीबरे, डॉ.योगिता भिलोरे,अश्विनी पाटोळे,प्रा.बागुल  यांसह महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक,महाविद्यालयातील महिला कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Leave a Reply

You cannot copy content of this page