पिकअपची बैलगाडीला जोरदार धडक, तिघांसह बैल जखमी
Pickup collided with bullock cart, three bullocks injured
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat18 Feb23 , 17.00 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील डाऊच खुर्द फाट्यानजीक झगडेफाटा ते पुणतांबा फाटा रोडवर शनिवारी पहाटे सहा वाजता पिकअप आणि बैलगाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांसह बैल जखमी झाले आहेत. डाऊच खुर्द परिसरात हा अपघात घडलाय. ही बैलगाडी काळे कारखाना ऊसतोड करणाऱ्या मजुराची होती.
याबाबत माहिती अशी की पुणतांबा फाटा ते झगडे फाटा रस्त्यावर डाऊच खुर्द हद्दीत कर्मवीर काळे कारखान्याची ऊस वाहतूक करणारी बैलगाडी व नाशिक कडून येणाऱ्या पिकअप यांच्यात धडक झाली. या अपघातात बैलगाडी मधील दोन पुरुष व एक महिला यांच्यासह बैल जखमी झाले आहे.
सदर रिकामी बैलगाडी ही कोपरगावच्या दिशेने जात होती व त्याच दिशेने जाणारा पिकअप (एम एच ०४ एच डी ८१२३) यांने बैलगाडीला धडक दिल्याने बैलगाडीतील राजेंद्र मंगू राठोड (वय ५०), दाजीबा राजेंद्र राठोड (३०) व एक महिला शोभा दिलीप गायकवाड (३५) हे जखमी झाले आहेत तसेच बैलगाडीचे बैलांना देखील जखम झालेल्या आहेत.
घटना घडल्यानंतर तिथे असलेल्या देवा पवार, दिगंबर पवार आकाश पवार व जोगेश्वरु इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापक सागर होन यांनी माजी सरपंच संजय गुरसळ यांना कळविले. सदरच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी तात्काळ फिल्डमन शिवाजी मोरे व मुकादम बबन मनोहर यांना कळविले. रुग्णवाहिकेतून जखमींना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. जखमी बैलांवर देखील उपचार सुरू आहेत. दरम्यान जखमींच्या उपचाराचा खर्च पिकअप चालकाने दिला मात्र लोकांची गर्दी वाढत असल्याचे पाहून पिकअप चालक गाडीसह पळून गेला. घटनास्थळी काळे कारखान्याचे अधिकारी उपस्थित झाले असून पुढील तपास सुरू आहे.
Post Views:
143